पुणे (हिं.स.) : केंद्र सरकारने संरक्षक डोस (बूस्टर डोस) मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी आजमितीला राज्यात पाच कोटी १४ लाख नागरिक संरक्षक डोस घेण्यापासून दूर राहिल्याची माहिती समोर आली आहे. आता डोस मोफत असल्याने किमान नागरिकांनी संरक्षक डोस घेऊन स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, अशी अपेक्षा आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे.
राज्यासह देशात करोनाच्या संसर्गाची साथ मार्च महिन्यानंतर ओसरली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या बीए ४ आणि बीए ५ या उपप्रकाराने डोके वर काढले. त्यापाठोपाठ आता बीए २.७५ या उपप्रकाराचे रुग्ण वाढले आहेत. आजमितीला राज्यात पुण्यासह मुंबई, नागपूर, ठाणे, पालघर; तसेच रायगड, अकोला, यवतमाळ या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सर्वाधिक ६५, मुंबईत ३३ रुग्ण आढळले आहेत.
आजमितीला राज्यात बीए ४ आणि बीए ५ या रुग्णांची एकूण ११३; तसेच बीए २.७५ प्रकाराचे ४० असे रुग्ण आढळल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संरक्षक डोस घेण्याचे आवाहन केले होते. केंद्राने यापूर्वी संरक्षक डोस केवळ खासगी रुग्णालयात सशुल्क उपलब्ध केले होते. त्यामुळे नागरिकांनी या डोसकडे पाठ फिरविली होती. परदेशात प्रवास करण्यासाठी काहींनी खबरदारीचा उपाय म्हणून संरक्षक डोस घेतला. मात्र, पुण्यासह राज्यात त्याचे प्रमाण कमी आहे. आता संरक्षक डोस सरकारी रुग्णालयात मोफत देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. त्यामुळे संरक्षक डोस आता सर्वांना मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.