मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने १४ जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. या परीक्षा आता १८ व १९ जुलै रोजी होणार आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसी व एमएस्सी फायनान्स या परीक्षेच्या ९ विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
कम्युनिकेशन स्किल्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स-१, फायनान्शियल अकाऊंटिंग अँड मॅनेजमेंट, इंटरप्रेन्युअरशीप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स अँड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा सोमवार १८ जुलै रोजी होणार आहेत. क्लिनिकल इम्युनोलॉजी अँड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा १९ जुलै रोजी होणार आहे.
परीक्षेच्या तारखेसंदर्भात समाजमाध्यमात काही चुकीचे संदेश पसरत आहेत, त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे. विषयांच्या तारखेबाबत विद्यापीठाची वेबसाइट व आपल्या संबंधित कॉलेजशी संपर्क साधावा असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.