नाशिक (प्रतिनिधी) : महानगरपालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ६९ मनपा शाळा या डिजिटल करण्यात येणार आहेत. या संपूर्ण शाळांमधील एकूण ६५६ वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. ज्यात डिजिटल बोर्ड असणार आहे.
कोणतीही गोष्ट शिकवताना विद्यार्थी हे त्यांच्या मनात त्या गोष्टीबाबत कल्पना करत ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. पण या डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल कॉन्टेन्ट, व्हिडीओ, इमेजेस, ग्राफिक्स, अॅनिमेशन या सर्वांच्या माध्यमातून गोष्टी शिकवता येतील. त्यामुळे कल्पनेतील गोष्टी प्रत्यक्षात बघून अभ्यासक्रम समजून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे. डिजिटल वर्गांमुळे शिक्षकाना देखील विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होणार आहे.
अवघड विषय हे सोप्या पद्धतीने शिक्षकांना मांडता येणार आहेत. या शाळांमध्ये डिजिटल लॅब उभारण्यात येणार आहे. ज्यात आय.टी. आणि आयटीसीबाबतचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले जाईल. या लॅबमध्ये कॉम्प्युटर्स तसेच इंटरनेट सुविधाही देण्यात येणार असल्यामुळे कॉम्पुटर विषयीचे, इंटरनेट वापराचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना मिळेल. पहिली ते दहावी पर्यंतचा राज्य शासनाचा सर्व अभ्यासक्रम हा डिजिटल स्वरूपात असणार आहे.
तसेच या सर्व तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, याबाबत शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. मनपा शाळांच्या या डिजिटलायझेशनमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये ज्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात, त्या सर्व आता विद्यार्थ्यांना मनपा शाळेत मिळणार आहेत. त्यामुळे गरीब-गरजू विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थीना सुविधा मिळणार असल्याने त्यांच्या कौशल्याला वाव देण्याची संधी मिळेल.
“मनपा शाळा डिजिटल करताना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुकर होईल, त्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सुविधांवर आपला भर असल्याचे नाम्युस्मासिडेकॉलिच्या आय. टी. विभागाचे महाव्यवस्थापक अनिल तडकोड यांनी नी म्हंटले आहे’. अभ्यासक्रम शिकवणे आणि शिकणे शिक्षक व विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे, असे मत नाम्युस्मासिडेकॉलिचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी व्यक्त केले.