पालघर (वार्ताहर) : महावितरणच्या पालघर मंडलात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दीडशेपेक्षा अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. वृक्ष उन्मळून पडल्याने व झाडांच्या फांद्या पडल्याने वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. संततधार पाऊस व वादळातही युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.
पालघर मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाड्यासह सर्व तालुक्यांमध्ये झाडांच्या मोठ्या फांद्या, झाडे वीज तारांवर पडून विजेचे खांब जमीनदोस्त होण्यासह वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसाने उच्चदाब वाहिनीचे ५७ व लघुदाब वाहिनीचे ११७ खांब पडले आहेत. महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदारांचे कामगार यांनी भर पावसात आतापर्यंत लघुदाब वाहिनीचे ४३, तर उच्चदाब वाहिनीचे ९० विजेचे खांब नव्याने उभारून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले आहे. तर उर्वरित विजेचे खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तथापि संततधार तसेच मध्येच बरसणाऱ्या मुसळधार पावसाने विजेचे खांब व वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना वाढल्या असून दुरुस्तीच्या ठिकाणी साठलेले पाणी, नद्यांची पूरस्थिती, तसेच गावांना जोडणारे बरेचशे रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वीज वहिनीजवळ पोहोचण्यास व दुरुस्तीचे काम करण्यात अडथळे येत आहेत. शक्य असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गाने बाधित ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. वीजपुरवठ्याची स्थिती, दुरुस्तीचे काम व साधनसामग्रीची उपलब्धता याबाबत ते सातत्याने आढावा घेतात. पालघर मंडलाच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, जनमित्र तसेच कंत्राटदारांचे कामगार नैसर्गिक आपत्तीत पालघर मंडलाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.