उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका आयुक्तपदाचा पदभार अजीज शेख यांनी मावळते आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून बुधवारी दुपारी स्वीकारला. त्यांनी शहरातील धोकादायक इमारती, तुंबलेले नाले, पाणीसमस्या, पाऊस याकडे लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या.
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डॉ. राजा दयानिधी यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी कोरोना काळात उत्तम काम करून शहराला कोरोनातून बाहेर काढले. मात्र त्यांचा जनसंपर्क नसल्याने, त्यांच्या कामावर टीका होत होती. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या बदलीची चर्चा होती.
नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी धुळे महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले असून ७ वर्षांपूर्वी त्यांनी कल्याण महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले. त्यांनी बुधवारी दुपारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर धोकादायक इमारती, पाणीटंचाई, रस्त्याची दुरावस्था, पावसामुळे निर्माण झालेली समस्या, नालेसफाई आदी कामाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी विभागावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर यांनी महापालिकेचे उपायुक्त, विभागप्रमुख, अधिकारी तसेच इतर मान्यवरांचा परिचय करून दिला. महापालिका निवडणुकीपूर्वी अजीज शेख यांची नियुक्ती झाल्याने, विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.