Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवैतरणा नदीपात्रात अडकलेले दहा कामगार सुखरूप

वैतरणा नदीपात्रात अडकलेले दहा कामगार सुखरूप

एनडीआरएफच्या जवानांचे बचाव कार्य पूर्ण

बोईसर (वार्ताहर) : दहिसर-बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी पुलाच्या बांधकामाचे काम करणाऱ्या दहा कामगारांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पाणी पातळीत घट झाल्याने जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान बार्जपर्यंत पोहोचले होते. बचाव अभियान पूर्ण झाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. नदीपात्राच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊन बार्जचा नांगर तुटल्याने बार्जवरील दहा कामगार नदीपात्रात अडकले होते.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर बहाडोली गावादरम्यान वैतरणा नदीपात्रात पुलाच्या बांधकामासाठी पिलर टाकण्याचे काम सुरू होते. नदी मध्यभागी पुलाच्या पिलर तयार करण्यासाठी बार्जवर दहा कामगार काम करीत होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने बार्जचा नांगर तुटल्याने एका नांगराच्या आधारावर बार्ज नदी पात्रात हेलकावे खाऊ लागला होता. बार्जवर दहा कामगार असल्याने जी आर कंपनीचे धाबे दणाणले होते. जी आर कंपनीकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला संपर्क साधल्यानंतर बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली होती. एनडीआरएफचे पथक, महसूल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

मुसळधार पाऊस आणि रात्रीच्या अंधारात बचाव कार्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात अपयश आले होते. कोस्ट गार्डला संपर्क साधण्यात आला होता. परंतु खराब हवामानामुळे बचावकार्य रात्री बारा वाजताच्या सुमारास थांबविण्यात आले होते.

गुरुवारी सकाळी सात वाजता पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. जी आर कंपनीच्या बोटीतून एनडीआरएफचे जवान वैतरणा नदी पात्राच्या मध्यभागी असलेल्या बार्जपर्यंत पोहोचले. सकाळी आठ वाजेपर्यंत बार्जवर अडकलेल्या दहा कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर नदीपात्राबाहेर कामगारांमध्ये भीतीने काफरे सुटले होते. कामगारांना सुखरूप बाहेर काढल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार, मंडळ अधिकारी, पोलीस कर्मचारी बचाव कार्यादरम्यान घटनास्थळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -