
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला आला आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात मुंबईच्या मीत शहाने ८०.२५ टक्के देशात पहिला क्रमांक मिळवला असून, दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल १२.५९ टक्के लागला.
आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल २१.९९ टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ६४३ उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल २१.९४ टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जयपूरच्या अक्षत गोयलने ७९.८८ टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने ७६.३८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या वेळी तपासणी पद्धतीमध्ये अधिक सुधारणा करून अत्यंत कमी कालावधीमध्ये अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजच्या काळात सनदी लेखापालांना मोठी मागणी निर्माण झाली आहे, असे आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहाचे कौतुक
राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
''मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक आणि नेहमीच्या अशा क्षेत्रांबरोबरच सनदी लेखापाल हे क्षेत्र व्यापार, उद्योग या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये मीत यांनी घवघवीत यश मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशात शहा कुटुंबियांचे पाठबळही महत्वपूर्ण ठरले असेल, त्यासाठी शहा कुटुंबियांचेही अभिनंदन'' असे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.