नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना समन्स बजावले असून, त्यांना २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
सोनिया गांधींना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यापूर्वी ईडीच्या कार्यालयात जाऊ शकल्या नाहीत, त्यांना ८ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. पण, त्यावेळी सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ईडीला या संपूर्ण प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची ईडीने अनेकवेळा चौकशी केली होती.
दरम्यान, आज पक्षाने एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यात सर्व सचिव, प्रदेश प्रभारी, पीसीसी प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीत ‘भारत जोडो यात्रा’ आणि संघटनेच्या कार्यक्रमावर चर्चा होणार आहे. या बैठकीत पक्षाचे प्रमुख सहभागी होणार असून या आंदोलनादरम्यान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चा आणि इतर कार्यक्रमांवरही चर्चा होणार आहे.
१८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे खासदारही सभागृहात आंदोलन करू शकतात.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शेरनी आहेत. त्यांना असल्या नोटिसींची भीती वाटत नाही. अशा अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या आहेत. त्यामुळे त्या ईडी कार्यालयात जातील.’