मुंबई : ‘खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरंही करतात. जंगलात सर्वाधिक शक्तीशाली झालं पाहिजे. मात्र, इतरांना मदत करणं ही मानवाची ओळख आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
संघ प्रमुख मोहन भागवत यांनी श्री सत्य साई यूनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सिलेन्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात भागवतांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. धर्मांतराचाही उल्लेख करत त्यांनी लोकसंख्येवरही मोठे विधान केले आहे.
केवळ जिवंत राहणे हा आयुष्याचा उद्देश असू नये. मनुष्याची अनेक कर्तव्य असतात. ती वेळोवेळी पार पाडली पाहिजे. केवळ खाणे आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात. शक्तीशालीही जिवंत राहतो हा जंगलाचा नियम आहे. पण, तोच शक्तिशाली जर दुसऱ्यांचे रक्षण करत असेल तर तो मनुष्य असल्याचा पुरावा आहे. जर तुमची भाषा वेगळी असेल तर वाद होणार. तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होणार. तुमचा देश वेगळा असेल तरीही वाद होणार. पर्यावरण आणि विकासात नेहमीच वाद झाला आहे. गेल्या हजार वर्षात अशा पद्धतीने जगाचा विकास झाला आहे, असेही ते म्हणाले.