नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरतला भेट दिली होती. सरकारने २०२६ मध्ये सूरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये चांगली प्रगती होत असून तोपर्यंत रेल्वे धावण्याचे काम पूर्ण करू असा विश्वास आहे, असे ते म्हणाले होते.
मुंबई ते अहमदाबाददरम्यान ताशी ३२० किमी वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. दोन्ही शहरांमध्ये ५०८ किमी अंतर असून त्यात १२ स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तीन तासांवर कमी होणार आहे. सध्या सहा तास लागतात. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत १.१ लाख कोटी रुपये आहे.
देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. देशातील जनताही बऱ्याच दिवसांपासून बुलेट ट्रेन धावण्याची वाट पाहत आहे. बुलेट ट्रेनचा प्रवास किती महाग असणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. तुमचाही प्रश्न असाच असेल, तर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच एका कार्यक्रमात याचे उत्तर दिले आहे. एका कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनचे संचालन २०२६ पासून सुरू होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे ते म्हणाले. सरकारने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. कार्यक्रमादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही बुलेट ट्रेनच्या भाड्याबाबत संकेत दिले होते. भाड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण ते लोकांच्या आवाक्यात असेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
बुलेट ट्रेनच्या भाड्यासाठी फर्स्ट एसी हा आधार बनवला जात आहे, जो जास्त नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यावरून बुलेट ट्रेनचे भाडे फर्स्ट एसीच्या बरोबरीचे असेल हे स्पष्ट झाले आहे. तसेच, बुलेट ट्रेनचे भाडे विमानापेक्षा कमी असेल आणि त्यात सुविधाही चांगल्या असतील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मात्र, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच भाडेवाढीबाबतच्या फाइलचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच दुसरा हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरू होईल.