Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीशरद पवारांमुळेच शिवसेना प्रत्येकवेळी फुटली

शरद पवारांमुळेच शिवसेना प्रत्येकवेळी फुटली

दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट!

नवी दिल्ली : शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे शरद पवार यांचाच हात होता, असा धक्कादायक दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवसेनेला कसे संपवण्याचे कारस्थान सुरू आहे, त्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत गौप्यस्फोट केला.

बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असा सवाल केसरकर यांनी विचारला आहे.

छगन भुजबळांना शरद पवार स्वत: बाहेर घेऊन गेले आणि राज ठाकरेंच्या बाबतीतही शरद पवारांचेच आशीर्वाद होते. कोल्हापूरचे आमदार फुटले त्यावेळी देखील शरद पवार होतेच, असे केसरकर म्हणाले.

“खरंतर या गोष्टी सांगायला नकोत. पण महाराष्ट्रात आज युद्धाची स्थिती झालीय म्हणून सांगतो. शरद पवारांनी त्यावेळी मला विश्वासात घेऊन सांगितले होते की जरी मी नारायण राणेंना बाहेर पडायला मदत केली असली तरी कुठल्या पक्षात जावे याची अट मी त्यांना घातली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा निश्चितच आहे. पण याचा सरळ अर्थ असा होतो की राणेंना बाहेर पडायला जी काय मदत हवी होती ती शरद पवारांनीच केली”, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.

आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीची विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ‘मातोश्री’ने कधी ‘सिल्वर ओक’कडे धाव घेतल्याचे आजवर आपण पाहिलेले नाही. पण उद्धव ठाकरेंभोवती असलेल्या काही निवडक नेत्यांमुळे शरद पवार त्यांना सध्या जवळचे झाले आहेत. शरद पवार नक्कीच मोठे नेते आहेत. पण शिवसेनेचे राजकारण आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच राहिलेले आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्णय आम्ही घेतला यात आमचे काही चुकले आहे असे आम्हाला वाटत नाही, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

“चुकीच्या नेत्यांचे मार्गदर्शन पक्षप्रमुखांना मिळत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी असे पाऊल उचलले आहे. आम्ही आमदार एकत्र आलो आणि भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतली. इतकेच कशाला आम्ही लहान होतो तर ज्या खासदारांना १५-२० लाख लोक निवडून देतात त्यांचेही म्हणणे तेच असेल तर ते विचारात घेणे गरजेचे आहे”, असे केसरकर म्हणाले.

“आमचा पक्ष संपतोय, आमची विचारधारा संपत आहे. मग आमच्या कुटुंबाच्या प्रमुखांनी ठाम निर्णय घेतला पाहिजे हा हट्ट लोकप्रतिनिधींनी धरला. ज्यावेळी संपूर्ण कुटुंब म्हणजेच अगदी शाखाप्रमुखापासूनचे लोक सांगतील की आम्हाला बाळासाहेबांच्या विचारांसोबत जायचे आहे. आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी नको. त्यादिवशी कुटुंबप्रमुख देखील ऐकतील”, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.

मी शिवसेनेतील शेवटचा मनुष्य असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे बाळासाहेबच म्हणाले होते, याचीही आठवण दीपक केसरकर यांनी यावेळी करुन दिली. मग त्याच काँग्रेससोबत जाणे ही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या विचारांची प्रतारणा आहे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगले माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असे म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीने एकट्याने निवडून यावे, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचे टॉनिक मिळाले आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

“राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणची भाषणं पाहा. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे, याचेच ते प्लानिंग गेले अडीच वर्ष करत आहेत आणि तसे करण्यासाठी शिवसैनिक जर पालखीचे भोई ठरणार असतील तर ते मान्य आहे का? याचा विचार शिवसैनिकांनी करायला हवा”, असेही केसरकर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -