Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

१६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक

मुंबई (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जिएसटी) विभागाकडून बोगस बिलाद्वारे शासनाच्या महसूल बुडविणाऱ्या विरोधात मोहिम सुरू आहे. याअंतर्गत १६१ कोटी रूपयांच्या खोट्या बिलांद्वारे २९.०१ कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविणाऱ्या रामचंद्र प्रधान यास अटक करण्यात आली आहे.


मे. सनशाईन ट्रेडर्स या कंपनीवर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सदर व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून मालाची वास्तविक खरेदी न करता ६९.९९ कोटी रूपयांच्या केवळ खोट्या बिलाद्वारे १२.५९ कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविला आहे. तसेच, मालाची वास्तविक विक्री न करता रू ९१.२५ कोटी रूपयांच्या केवळ खोट्या बिलांद्वारे १६.४२ कोटी रूपयांची चुकीची कर वजावट निर्गमित करून शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले आहे.


महानगर दंडाधिकाऱ्यांनी निराकार रामचंद्र प्रधान यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त अन्वेषण- अ, मुंबई, राजेंद्र टिळेकर, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त नामदेव मानकर, संजय शेटे व अनिल पांढरे यांनी केली.

Comments
Add Comment