Monday, May 5, 2025

पालघर

जव्हारमध्ये ‘एक गाव एक वाण’

जव्हारमध्ये ‘एक गाव एक वाण’

जव्हार (वार्ताहर) : पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा सुखावला असताना पालघर जिल्ह्यात भातपिकाची उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागामार्फत अनोखा प्रयोग राबवला जातो आहे. खरवंद व डेंगाची मेट या गावात ४५ हेक्टर जमिनीत एक गाव एक वाण या धर्तीवर यांत्रिकी पद्धतीने दप्तरी भाताची लागवड करण्यात आली आहे. वाफ्यावर रोप तयार करून शास्त्रोक्त रीतीने रोपांची मांडणी करत या शेतीचे नियोजन केले जात आहे. पारंपरिक शेतीपेक्षा या नव्या पद्धतीमुळे एकरी पाचशे ते एक हजार किलो जादा भात पीक मिळून शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होणार आहे. जव्हार तालुका आदिवासी बहुलभाग म्हणून ओळखला जातो.

पावसाळा सोडला तर या ठिकाणी अनेक भागात पाण्यासाठी ग्रामस्थांना ओढाताण करावी लागते. शेतीसाठी कामगार शोधणे, त्यांची मजुरी, वेळ या सर्वांचे गणित लावले तर शेती करणे अवघड होते; परंतु भातशेतीला चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षेअंतर्गत एक गाव एक वाण या धर्तीवर भात लागवडीचा उपक्रम जव्हार तालुक्यात प्रथमच सुरू केला असल्याची माहिती कृषी अधिकारी वसंत नागरे यांनी दिली.

तालुक्यातील खरवंद आणि डेंगाची मेट या गावातील शेतकऱ्यांना मे महिन्यात या योजनेची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. जमीन निवड, मातीची परीक्षण, वाणाची निवड, शेतीसाठी ड्रम सिडरणे अथवा टोकण पद्धतीने भात लागवड, मॅट नर्सरीवर रोपे तयार करणे, यंत्राच्या साहाय्याने भात लागवड, ट्रे मध्ये रोपे तयार करणे आदींची माहिती या प्रशिक्षणादरम्यान कृषी तज्ज्ञ भरत कुशारे यांनी दिली होती. आता पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा होत असल्याचे खरवंदे गावातील सदाशिव राऊत, गोविंद गावीत, बाळकृष्ण चौधरी, विष्णू चौधरी आदी शेतकरी सांगतात.

पारंपारिक शेतीसाठी हेक्टरी सर्वसाधारणपणे १५ ते २० हजारांचा खर्च येत असून, शेती व्यवस्थापनात त्रुटी होत असल्याने त्याचा परिणाम पिकावर होतो. परंतु ‘एक गाव एक वाण’ ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. - वसंत नागरे (कृषी अधिकारी, जव्हार)

एक गाव एक वाण ही योजना प्रथमच आमच्या गावात आली आहे. गटशेतीच्या माध्यमातून, गावातील सर्व शेतकऱ्यांनी भात पेरणीच्या ‘दप्तरी’ वाणाची निवड केली आहे. शेतीसाठी कोणतेही रासायनिक खत न वापरता, सेंद्रिय खताचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा या नव्या तंत्राचा फायदा नक्कीच होईल. - सदाशिव राऊत (शेतकरी, खरवंद, जव्हार)

Comments
Add Comment