सीमा दाते
दर वर्षी मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसात मुंबईची तुंबई होत असते, सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासकांनी कितीही दावे केले तरी दर वर्षीच्या पावसात हे दावे फोल ठरतात.
या वर्षीच्या पावसातही मुंबईची अशीच काही स्थिती झाली आहे. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या दिवसात पावसाने हजेरी लावली आणि पहिल्याच मुसळधार पावसात मात्र मुंबईची दाणादाण झाली. जागोजागी मुंबईतल्या सखल भागात पाऊस झाल्यामुळे पाणी साचले. दादर, माटुंगा, हिंदमाता, काळाचौकी, चेंबूर, सायन, गांधी मार्केट, अंधेरी, विरा देसाई रोड, मिलन सब-वे, अंधेरी सब-वे अशा कित्येक भागात पावसामुळे पाणी साचले होते. रस्त्यावर ट्रॅफिक, वाहतुकीचा खोळंबा, अनेक ठिकाणी वाहतूक वळवली, लोकल उशिरा अशा कित्येक समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागलं. हा पाऊस पाहिलाच मुसळधार पाऊस होता आणि असे असतानाही इतक्या समस्या मुंबईकारांसमोर आल्या होत्या. अजून तर पावसाचे ३ महिने बाकी आहेत आणि पहिल्याच पावसात ही अवस्था असेल, तर बाकीच्या दिवसात मुंबईकरांना किती त्रास काढावा लागेल, हे तर म्हणायलाच नको.
या वर्षी ७ मार्चला महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च रोजी मुंबई महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आणि यामुळे शेवटच्या स्थायी समितीतील काही प्रस्ताव उशिराने मंजूर करण्यात आले होते. यामुळे पावसाळी कामांना उशिर लागला होता. १६२ कोटींची नालेसफाईची कामे यावेळी देण्यात आली. यात लहान आणि मोठे असे दोन्ही नाले होते. मात्र उशिरा काम दिल्यामुळे काहीसा वेळ लागला. मात्र त्यानंतर नालेसफाईची कामे प्रत्यक्षात सुरू झाली. मात्र विरोधकांनी देखील प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर नालेसफाई पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांनी १०० टक्क्यांहून अधिक नालेसफाई केली असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा या पहिल्या पावसातच फोल ठरला आहे.
विशेष म्हणजे मिलन सब-वेमध्ये पाणी साचणार नाही, असाही दावा पालिकेने केला होता. मात्र मिलन सब-वेत पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करावा लागला. यामुळे पालिकेचे सगळे दावे खोटे ठरले, असल्याचं पाहायला मिळाले आहे. हिंदमाता येथे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रमोद महाजन उद्यानात साठवण टाकी बांधण्यात आली आहे. याच धर्तीवर सुमारे ३० कोटींहून अधिक खर्च करून मिलन सब-वे येथे देखील जलाशय साठवणचे काम सुरू आहे. मात्र याचा तात्पुरता वापर जुलैमध्येही करण्यात येणार होता. मिलन सब-वे येथील साठवण जलाशय हे सुमारे २ कोटी लीटर क्षमतेचे आहे. मिलन सब-वे परिसरात जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास त्याचा उपसा करून या जलाशयात साठवले जाईल. त्यासाठी ३ हजार घन मीटर प्रतितास क्षमतेचे एकूण दोन उदंचन पंप कार्यान्वित केले जातील. म्हणजेच प्रतितास ६ हजार घनमीटर या क्षमतेने पाण्याचा उपसा होऊ शकणार आहे. ८ एप्रिल २०२२ पासून या साठवण जलाशयाचे काम सुरू करण्यात आले असून ७० मीटर x ५५ मीटर आकाराच्या या जलाशयाची खोली सुमारे १०.५ मीटर असणार आहे, तर पैकी ८ मीटर खोलीपर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे, तर आतापर्यंत सुमारे ७० टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. मात्र तरीही मिलन सब-वेमध्ये पाणी साचले होते आणि वाहतुकीसाठी देखील बंद करण्यात आला होता.
इतकेच नाही तर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तर मुंबईत पाणी तुंबण्याच्या समस्येला महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचं म्हटले आहे. मुंबईत महापालिकेने जिथे जिथे पाणी साचणार असे फ्लडिंग स्पॉट शोधून काढले होते. मात्र यावेळी या फ्लडिंग स्पॉटच्या ऐवजी इतरही नवीन भागांमध्ये पाणी साचले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे या सगळ्याला पालिकाच जबाबदार असल्याचं बोलले आहेत. विशेष म्हणजे नालेसफाई केल्यानंतरही ही परिस्थिती का उद्भवली? याचा विचार पालिकेने करणे गरजेचे आहे. गेले कित्येक वर्षे याच याच समस्यांना पावसाळ्यात मुंबईकरांच्या समोर येत आहेत. मात्र तारीही या समस्यांचे निवारण कधी झालेले नाही. २६ जुलैसारखा पूर मुंबईत येऊन गेला. मात्र तरीही महापालिका यातून काही शिकलीच नसावी, असे वाटत आहे. आज मुंबईचा विकास झाल्यानंतरही हीच परिस्थिती दर वर्षी येत आहे. म्हणजे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आता केवळ पावसाच्या समस्या येतात. मात्र काही दिवसातच मुंबईत खड्ड्यांच्या देखील समस्या उद्भवायला सुरवात होतील. त्यानंतर मात्र मुंबईकरांनी आपला वाली म्हणून कोणाकडे पाहायचा कारण ३० वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली. ते आता पावसात फिरकतानाही दिसले नाहीत. म्हणजे या वर्षीही मुंबईकरांची परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असणार आहे, हे नक्की. आणि प्रशासन केवळ दावे करणार तेही साचलेल्या पाण्यात वाहून जाणार!