लंडन (वृत्तसंस्था) : प्रेक्षकांवर थुंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टेनिसपटूला लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. निक किर्गिओस असे या खेळाडूचे नाव आहे. विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक किर्गिओसने प्रेक्षकांसोबत गैरवर्तन केले. याची शिक्षा म्हणून त्याला १० हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे ८ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.
या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. याशिवाय या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य १३ खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
निक किर्गिओस सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर थुंकला होता. स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत कबुली दिली होती. त्यानंतर त्याला ऑल इंग्लंड टेनिस क्लबने शिक्षा म्हणून दंड आकारला आहे. किर्गिओसच्या आधी, स्वीडिश टेनिसपटू अलेक्झांडर रिटशार्डला या स्पर्धेत पाच हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.