पणजी : २० रुपयांचा वडापाव खाऊन प्रचार करणा-या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांकडून १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र कशासाठी? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे तर प्रेमाचे बंधन हवे, शिवबंधन हेच प्रेमाचे बंधन आहे, असे शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीही या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. “पक्षाकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत. लोकांना प्रेमाने बांधवे लागते. प्रेमाचे बंधन बाळासाहेबांनी आम्हाला बांधले. प्रतिज्ञापत्र देणे म्हणजे कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवत आहात,” असे दीपक केसरकर म्हणाले.
आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून घालतो. आम्ही खरे सैनिक आहोत. आम्ही सर्व कार्यकर्त्याना सांगू इच्छितो, असे अॅफिडेविट केल्यानंतर काहीही होत नाही, असेही केसरकर म्हणाले.
पक्षप्रमुखांकडेच प्रतिज्ञापत्र मागितलं तर… – मनसेची टीका
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र मागण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीका केली आहे. आधी शिवबंधन झाले, आता प्रतिज्ञापत्र घेणार आहेत. पण उद्या समजा एखाद्या शिवसैनिकाने पक्षप्रमुखांकडे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्त्वाचे विचार सोडणार नाहीत असे प्रतिज्ञापत्र मागितले तर त्यांच्याकडून असे प्रतिज्ञापत्र दिलं जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.