Saturday, July 13, 2024
Homeमहत्वाची बातमीशिवसेनेकडून कार्यकर्त्यांकडे निष्ठेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी

शिवसेनेकडून कार्यकर्त्यांकडे निष्ठेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी

शिंदेंच्या बंडानंतर आता १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केले जाताहेत करार

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर आता शिवसेनेकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शिवसेनेवर निष्ठा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडे मागितले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे. यासाठी पक्षाच्या आमदारांपासून गटप्रमुखांपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृ्त्त्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करत आहे, असा मजकूर असलेल्या प्रतिज्ञापत्रावर आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडून स्वाक्षरी घेतली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत अस्वस्थता आहे. शिवसेना खासदारांनीही थेट पक्षप्रमुखांकडे काल शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता बंडाचा झेंडा आणखी कोण कोण हाती घेणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता सावधगिरी म्हणून पक्षप्रमुखांबरोबर राहिलेले आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्यात येत आहे.

“माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही देतो,” असे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -