Thursday, July 18, 2024
Homeमहामुंबईमनोरंजन उद्योग क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्यास भारत सज्ज

मनोरंजन उद्योग क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्यास भारत सज्ज

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

मुंबई-पुणे (वृत्तसंस्था) : देशातील डिजिटल पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार होत आहे आणि एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीमुळे, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे पसंतीचे निर्मिती पश्चात प्रक्रिया क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र बनवण्याची क्षमता भारतात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले.

सिम्बॉयोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या वतीने पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठात ‘माध्यमे आणि मनोरंजन या क्षेत्रातील बदलते परिप्रेक्ष्य-२०२२ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आपल्या भाषणात बोलत होते. “एव्हीजीसी क्षेत्रासाठी एक भक्कम डिजिटल पाया देशभरात उदयाला येत आहे आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची सर्जनशील प्रतिभा विकसित करण्यासाठी सरकारने एव्हीजीसी क्षेत्रासाठी कृती दलाची स्थापना केली आहे.”, असे त्यांनी सांगितले.

माध्यम आणि मनोरंजन कार्यक्षेत्र हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे, २०२५ पर्यंत या क्षेत्राचा आकार ४ लाख कोटी रुपये असेल आणि २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्स किंवा ७.५ लाख कोटी रुपये आकारमानाच्या उद्योगांपर्यंत पोहोचेल, असे ते म्हणाले. भारत सरकारने १२ महत्त्वाच्या सेवा क्षेत्रांमध्ये ध्वनी -चित्र सेवा सुरू केल्या आहेत आणि शाश्वत विकासाच्या उद्देशाने प्रमुख धोरणात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत, असे अनुराग सिंह ठाकूर म्हणाले.

आपण दर्जेदार आशय निर्मितीच्या डिजिटल युगात प्रवेश करत असताना रेडिओ, चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. “चित्रफीत संकलन , कलर ग्रेडिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), ध्वनी रचना, रोटोस्कोपिंग, ३डी मॉडेलिंग इ. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उदयाला आल्या आहेत. “या क्षेत्रातील प्रत्येक नोकरीसाठी विशिष्ट कौशल्ये आणि क्षमतांची आवश्यकता असते. यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन या क्षेत्राच्या गरजेनुसार कार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे,”असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी हे या क्षेत्रातील आगामी तंत्रज्ञानाच्या कल यासोबत सुसंगत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार खासगी क्षेत्रासोबत नव्या भागीदारीच्या देखील शोधात आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

राष्ट्रीय परिषदेत अनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स या क्षेत्रातील उभरत्या संधी, ओटीटी, दूरचित्रवाणी, चित्रपट निर्मिती, अग्युमेंटेड रियालिटी अर्थात संवर्धित वास्तव आणि वर्च्युअल रियालिटी अर्थात आभासी वास्तव संबंधित माध्यम कौशल्य हे या राष्ट्रीय परिषदेतील चर्चेचे मुख्य विषय होते. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत मंडळी, सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बी. मुजूमदार, प्रकुलगुरू डॉ. स्वाती मुजूमदार, उपकुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आदींचा उपस्थितांमध्ये समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -