Tuesday, July 8, 2025

एमएसएमईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध - नारायण राणे

एमएसएमईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध - नारायण राणे

नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, या उद्योगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.


आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त आपल्या संदेशात ते म्हणाले की, कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरताना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने आपल्या उद्योग व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्याबरोबरच उत्पादन खर्चातही कपात केली आणि अत्यावश्यक उत्पादनांची देशात निर्मिती करून आयात कमी करण्याची नवीन परंपरा सुरु करत सरकारच्या विविध योजनांच्या सहाय्याने त्या उत्पादनांची निर्यातही सुरू केली. या उद्योगानी त्यांच्या ऑनलाइन सेवा जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले, परिणामी त्यांना प्रतिकूलतेवर मात करता आली असे ते यावेळी म्हणाले.


राणे म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि जागतिक शाश्वत विकासाचा कणा आहे. स्थानिक समुदायांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग योगदान देत आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी २७ जून रोजी “आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन” साजरा केला जातो.


ते म्हणाले की, यावर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनाची संकल्पना “लवचिकता आणि पुनर्बांधणी: शाश्वत विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग” अशी आहे. छोट्या ग्रामीण, कुटीर आणि पारंपारिक उद्योगांनाही भरभराटीची संधी देणारे व्यवसाय पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याचे सरकारला स्मरण राहावे जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा केला जातो.


प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे राणे यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment