मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४०हून आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय, काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या परिवाराला सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षपाती राजकारणाला कंटाळून शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात पेच निर्माण झाला आहे. आमदारांच्या संख्याबळा अभावी महाविकास आघाडी सरकार पडणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरुद्ध आंदोलन करत त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवला आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे. या हिंसक कृत्यामुळे बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील १५ बंडखोर आमदारांच्या घरी केंद्राकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. याशिवाय, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे. तसेच, आज संध्याकाळपर्यंत अथवा रात्री उशिरापर्यंत १५ आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव व राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर केंद्राने हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘या’ आमदारांना पुरविली सुरक्षा
रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय सिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरवणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भूसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर, संदीपान भुमरे या १५ आमदारांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या आमदारांच्या घरासमोर ही तुकडी तैनात करण्यात आली आहे, तर सुरक्षेसाठी बॅरिकेट्सही लावण्यात आली आहे.