जालना (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यादरम्यान या सत्तानाट्यात भाजपने उडी घेतली आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोरच येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा केला आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दानवे उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही जिल्ह्यात आमदार, खासदारांना त्यांचा मान द्या, राज्यात गोंधळ सुरू आहे म्हणून हे म्हणत नाही. आमचं उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसते, अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल लक्षात येत नाही? सकाळी फोन करून सांगतात, ही चांगली पद्धत नाही. सरकार येतील सरकार जातील, आम्ही विरोधी पक्षात असलेले चांगले आहे, असे बोलता येते. दोन-तीन दिवसांत हेही बंद होणार आहे, टोपेसाहेब लक्ष ठेवा’, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
त्यांच्या या सूचक वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तसेच दोन-तीन दिवसांत भाजपचे सरकार राज्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने याच्याशी आमचा संबंध नसल्याचे सांगत ही शिवसेनेतील अंतर्गत गोष्ट असल्याचे म्हटले होते.