ठाणे : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेना टप्याटप्प्याने आक्रमक होताना दिसत आहे. सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आज बंडाच्या पाचव्या दिवशी एकनाथ शिंदे गट माघार घ्यायला तयार नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत शिवसैनिकांना आक्रमकपणे किल्ला लढवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आता राज्यभरात शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र, त्यानंतरही शिवसेना शिंदे गटाशी दोन हात करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे सरकारला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शनिवारी दुपारी एकनाथ शिंदे समर्थकांकडून ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
आज दुपारी चार वाजता ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक जमणार आहेत. यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ठाण्याचे सर्वार्थाने पालक असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना आपले समर्थन देऊया. शिंदे साहेबांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्यासाठी उद्या २५ जूनला दुपारी ४.०० वाजता साहेबांच्या निवासस्थानी जमुया, असे मेसेजेस शिंदे समर्थकांकडून पाठवले जात आहेत. त्यामुळे आज दुपारी चार वाजता ठाण्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. एकनाथ शिंदे असं कसं काय म्हणू शकतात? ते महाराष्ट्राच्याबाहेर आहेत. त्यांनी गुवाहाटीला पलायन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत स्वत:चे सुरक्षारक्षक नेले आहेत. त्यांना जी सुरक्षा आहे ती आमदार म्हणून आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची सुरक्षा नसते. तुम्ही असे वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. राज्यात परत या, या महाराष्ट्राची इभ्रत धुळीला मिळवू नका. एकनाथ शिंदे स्वत:ला वाघ म्हणवतात, मग त्यांनी बकरीसारखं वागू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.