वर्षा भुर्के
श्रीमंती कोणाला नको असते? ते तर प्रत्येकाचे स्वप्नच असते. माणसाच्या या स्वभावाचे पूर्ण ज्ञान असलेले लोक कमी वेळात जास्त परतावा देण्याच्या योजना काढत असतात. फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियामधून तसेच पेपरमधून हे लोक आपल्या योजनांची जाहिरातबाजी करतात. या योजनांच्या मोहात पडून, लोक कोणताही विचार व अभ्यास न करता स्वतःची कष्टाची कमाई त्यामध्ये गुंतवतात व काही कालावधीत जास्त उत्पन्न, तर सोडाच पण स्वतःचे मुद्दलही गमावून बसतात.
वर्तमानपत्रात अशा प्रकारच्या बातम्या आपण नित्यनियमाने वाचत असतो. त्याचबरोबर सरकारी आर्थिक नियामक मंडळे याविषयी वारंवार जनजागृती करताना आपण पहातो/वाचतो. पण त्यामधून लोक बोध घेताना दिसत नाहीत आणि मोहाला बळी पडतात. या ‘भूल पाडू’ स्कीमची सुरुवात नेहमी एका ‘अति शहाण्याकडून’ होते. त्याची साखळी तयार केली जाते. या योजनांमध्ये साखळ्या निर्मितीची प्रचंड जादू असते, कारण मिळणारे आकर्षक कमिशन. साहजिकच ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र मंडळी यांना या साखळीत ओढण्यात येते. सुरुवातीला आकर्षक परतावा मिळतो, त्यामुळे विश्वास वाढतो. साखळी वाढते. यालाच मल्टि लेवल मार्केटिंग म्हणतात (MLM). नंतर काही काळाने परतावा मिळायचा बंद होतो. तोपर्यंत एजंटचे ऑफीस बंद झालेले असते. मूळ मालक फरार झालेला असतो.
अशा योजना पॉन्झी नावाने ओळखल्या जातात. चार्ल्स पॉन्झी नावाच्या एका फसव्या व्यक्तीने अशा प्रकारच्या घोटाळ्याची सुरुवात १९१०मध्ये अमेरिकेत केली. आधीच्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांचा निधी वापरला जातो. या योजनेत गुंतलेल्या कंपन्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्ती केंद्रित करतात. पण जेव्हा साखळीचा प्रवाह थांबतो तेव्हा सगळेच गुंतवणूकदार अडचणीत सापडतात.
अलीकडेच “oksome.in” आणि “superlike” या योजनांची जाहिरात एका ओमनी.कॉम (omni.com) या समूहाद्वारे केली गेली होती. समूहाच्या प्रमोटर किंवा प्रवर्तकांची काहीही माहिती उपलब्ध करून दिलेली नव्हती. बँक हमी दाखविली होती. पण ती बँकच अस्तित्वात नव्हती. असंख्य इंटरनेट सेलिब्रिटींद्वारे यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले व्हीडिओ आणि मेसेज लाइक करण्याच्या बहाण्याने ओकेसम सभासदांकडून पैसे गोळा करत होती. शिस्तबद्धरीत्या लोकप्रियता वाढण्यासाठी हे पैसे वापरले जातात, असा त्यांचा दावा होता. सोशल मीडियावरील फेसबुक, यूट्यूबवर या योजनेची विश्वासार्हता दाखवण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे पोस्ट केली जात होती.
VIP (लेवेल ४ व ५) पास विकत घेण्यासाठी रु. १०००० ते ३०,००० गुंतवून (व्हीडिओ किंवा मेसेज लाइक) करण्यासाठी २ लाख ते ६ लाख उत्पन्न देण्याची योजना असते. कमी लेव्हलचे पास घेण्यासाठी कमी पैसे गुंतवा, असे सांगून त्या प्रमाणात उत्पन्न देण्याची योजना असते. ज्या ग्राहकांना या योजनेत पैसे गुंतवता येत नसतील, अशा गुंतवणूकदारांसाठी ते एकाहून अधिक खात्याची नोंदणी तसेच फ्रेंड रेफरल उत्पन्नाची ऑफर देतात.
आमंत्रित बक्षीस योजनेच्या संदर्भात ओकेसमने १५ ते ३% पर्यंतच्या तीन स्तरीय वितरण पुरस्काराचे आश्वासन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जर तुम्ही A सदस्याला श्रेणीसुधारीत करण्याची शिफारस केली असेल, तर १५% बक्षीस. जर A ने B ची श्रेणी सुधारित करण्यासाठी शिफारस केली, तर तुम्हाला ५% बक्षीस. व B ने C ची श्रेणी सुधारित करण्याची शिफारस केली, तर ३% बक्षीस. असे हवेत मजले चढविणे चालूच आहे; परंतु या इमारतीचा पायाच कुठे दिसत नाही. Oksome.in हे संकेतस्थळ सध्या बंद आहे. तथापि ऑफर केलेल्या बऱ्याच योजनांचे त्यांचे व्हीडिओ अजूनही फिरतच आहेत. याचाच फायदा घेत टेलिग्राम समूह करून लोकांची फसवणूक चालूच आहे.
ओकेसमच्या माजी सदस्याने Trustpilot.com ह्या संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या टिप्पण्यांनुसार या कंपनीची कोणतीही ओळख नाही आणि हेल्पलाइन नंबर नाही. त्यामुळे कंपनी कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी ओम्नी ग्रुपची आहे. पण ओम्नी ग्रुपमध्ये कधीही सुपर लाइक आणि ओकेसमचे सभासद फोन करू शकत नाहीत. समस्या आलीच, तर कंपनी सरळ एजन्टशी संपर्क करायला सांगते. एजन्ट फक्त व्हॉट्सअॅपवर काम करतात. पण ते बंद असतात त्यामुळे संपर्क होऊ शकत नाही.
ओकेसम कंपनीने सध्या परतावा देणे पूर्णपणे थांबविले आहे तसेच सदस्यांची खाती गोठवली आहेत. कोणत्यातरी सदस्याने नियमभंग केला आहे, असे कारण पुढे केले जात आहे. अर्थात हा सदस्य कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले गेलेले नाही. खाते परत सुरू करण्यासाठी त्यातील वरच्या श्रेणीत जावे लागेल, असे सांगण्यात येते. म्हणजेच अधिक गुंतवणूक करा, पैसे भरा असे सांगण्यात येत आहे. अगोदर भरलेले पैसे वाचविण्यासाठी काही सभासद तरी आणखी गुंतवणूक करतील, असा कंपनीचा होरा दिसून येतो. असे सर्व गौडबंगाल आहे. २०१० मध्ये उघडकीस आलेल्या ‘स्पीक एशिया’ नावाच्या जुन्या घोटाळ्याचाच हा नवीन अवतार आहे, हे स्पष्टच आहे.
थोडक्यात आपल्या कष्टाच्या पैशावर गुंतवणूक करण्यासाठी ओकेसम किंवा सुपरलाइक योजनेपासून दूर रहा. जर तुम्ही आधीच पैसे गुंतवले असतील, तर पोलीस स्टेशनला तक्रार करा. कंपनी व इतर कोणी तुम्हाला या योजनेत सामील करून असेल, त्याविरुद्ध तक्रार नोंदवा. सजगतेने गुंतवणूक योजनांचा अभ्यास करून कष्टाच्या कमाईची गुंतवणूक करा.
[email protected]