जे. एस. संधू
भारतीय लष्करात भरती होण्यासाठीची ‘अग्निपथ’ या योजनेबाबत ज्येष्ठ वर्गात आणि माध्यमांमध्ये तीव्र चर्चा होते आहे. मला सर्वात अधिक आश्चर्य याचं वाटतं की, यातल्या जास्त प्रतिक्रिया या योजनेवर टीका करणाऱ्या आहेत, यातल्या क्वचित प्रतिक्रिया या सकारात्मक दिसतात. या योजनेचा विरोध करणारे विचार हे केवळ गैरसमजातून तयार झालेले आहेत आणि जी तीव्र विरोधाची परिस्थिती निर्माण केली जाते, तिला समर्थन दिलं जातं आहे. सत्यता नाकारून नकारात्मकता निर्माण केली जातेय आणि पसरवली जातेय; परंतु खरंच या योजनेत त्रुटी आहेत का? मी यातल्या ठळक मुद्द्यांवर समीक्षा करणार आहे.
क्रियात्मक प्रभाव
वादाचा मुद्दा हा आहे की, जे अग्निवीर थोड्या कालावधीसाठी सेवा बजावणार आहेत, ते ‘टुरिस्ट’ तात्पुरते सैनिक प्रभावी सैनिक ठरणार नाहीत. ‘टूअर ऑफ ड्युटी’ला ‘टुरिस्ट’ असं संबोधने अगदी लाजिरवाणे आहे, खरंच याचा प्रभाव लहान कालावधीसाठी सेवा देणाऱ्या सैनिकांच्या कार्यशैलीवर पडतो का? मी या संदर्भात काही पुरावे शोधले. जागतिक युद्धामध्ये भारतीय सैनिकांची सेवा ही सात वर्षांची होती आणि या सैनिकांनी युद्धात मोठं शौर्य दाखवलं. बरेचसे व्हिक्टोरिया सन्मान आणि इतर पारितोषिक विजेत्या सैनिकांचा सेवा कालावधी पाच वर्षांपेक्षा कमी होता. इस्रायली लष्करात सक्तीने भरती केलेले जवानसुद्धा दोन वर्षांपेक्षा कमी सेवा देतात, हे सर्व प्रभावी सैन्य होते. सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात लढणारे सक्तीचे सैनिकही अगदी जोमाने युद्ध लढत आहेत. ते सध्या निष्णात सैन्याबरोबर ड्रोन, क्षेपणास्त्र, रणगाडे, तोफा चालवत आहेत. त्यामुळे सेवेचा लहान कालावधी हा काही पराक्रम किंवा लढण्याची क्षमता मोजण्याचे मापदंड असू शकतं नाही. यासाठी सैनिकाचा आत्मविश्वास, प्रेरणा आणि जोखीम पत्करण्याची कला हे योग्य मापदंड असू शकतात.
जेव्हा हे तरुण अग्निवीर आपल्या देशासाठी सीमेवर लढण्यासाठी उभे असतील, तेव्हा ते या सर्व कलांनी सक्षम असतील. (इस्रायली, युक्रेन आणि रशियन सैन्याप्रमाणे) आपण आपले तरुण सैनिक कारगिल, गलवान, चुमार आणि काश्मीरच्या इतर भागातल्या कारवायात लढताना बघतो. उदाहरण म्हणून सांगतो, मी दोन युवक सैनिक पाहिलेत जे सीमेवर तैनात होते, त्यांनी चार पाकिस्तानी घुसखोराना बंदुका खाली ठेवण्यास भाग पाडले होते आणि विशेष म्हणजे त्यांचा सेवा कालावधी केवळ तीन ते चार वर्षांचा झालेला होता. खरंय, तरुण सैनिक हे वयस्क सैनिकांपेक्षा अधिक जोखीम स्वीकारतात. जेव्हा सीमेपलीकडचे शत्रू सैन्य ताकतवर असते किंवा कारगिलच्या उंच पहाडांवरच्या शत्रूच्या छावण्यावर हल्ला करायचा असतो, तेव्हा यांसारख्या जोखीम स्वीकारणाऱ्या तरुण जवानांमुळेच प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी मोठा फरक बघायला मिळतो. थोडक्यात, कोणत्याही लष्करातले तरुण सैन्य हे त्या लष्कराचा लढाऊबाणा सिद्ध करत असते. धैर्य आणि साहस यासाठी नेतृत्वगुण हा घटक महत्त्वाचा असतो. आमच्या सैन्यानं आणि तरुण अधिकाऱ्यांनी याआधीच्या युद्धात आणि कारवायांमधून आपल्या लढाऊ बाण्याची चुणूक दाखविली आहे. ही नेतृत्वाची खाण अजूनही तेवढीच मजबूत आहे. अग्निवीरांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आव्हान पेलण्याची क्षमता आपल्या सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांमध्ये आहे. चला ज्येष्ठांनो आपणही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूया. आणखी एक बाब, जी सैन्य दलाची प्रतिमेला मलीन करतेय ती म्हणजे, लष्करातील निवृत्त अधिकारी समाजमाध्यमांवर या प्रश्नावर नकारात्मक प्रतिक्रिया मांडत आहेत. या दिग्गजांनी आपलं नकारात्मक मत आपल्या गणवेशाची शान वाढविण्यासाठी वापरलं पाहिजे. त्याचबरोबर या मुद्द्यावर तीव्र विरोध सहन करणाऱ्या आपल्या पेशातल्या लोकांचा (नियमित आणि अग्निवीर) आत्मविश्वास वाढविला पाहिजे.
अग्निवीर आणि सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेतून आलेले सैनिक यांच्यात पक्षपात केला जाऊन दोन्ही प्रकारच्या सैनिकांच्या भर्ती रँकमध्ये फरक असणार आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. इतर सैन्यदलही नव्याने विविध भर्ती प्रक्रियेमधून आलेल्या सैनिकांना सामावून घेण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळतात. बदलाची ही प्रक्रिया आपण स्वीकारली पाहिजे. मला खात्री आहे की, आमचे कमांडिंग अधिकारी आणि वरिष्ठ प्रमुख वेगवेगळ्या सेवेसंदर्भातल्या अटी हुशारीने हाताळतील. यामुळे तीनही दलांवर (बटालियन, स्क्वाड्रन किंवा शीपवर) नकारात्मक प्रभाव पडू शकतो का? याबाबत येणारा काळचं ठरवेल. पण निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यात तीनही दल सक्षम आहेत.
अग्निवीरांचे नागरी जीवनातील संक्रमण
अग्निवीर योजनेबाबत अशीही भीती व्यक्त होत आहे की, अग्निवीर हे आपल्या भविष्यातल्या नोकरीबाबत अधिक चिंतीत राहतील किंवा ते सैनिकी कामातील आपली रुची कमी करतील. खरं आहे, काही कामात आवड कमी होऊ शकते जसे की, शांत ठिकाणी होणाऱ्या ‘पार्टी ड्युटी’ ज्या आजही चालू आहेत. अग्निवीरांच्या भविष्यातल्या नोकरीसंदर्भात सरकार विविध मार्गांनी तोडगा काढू शकते. जसे सेवेबद्दल चांगला पगार देणे, शिक्षण आणि इतर बाबतीत सवलती, शिष्यवृत्ती देणे आदी अमेरिकेत सवेत असलेल्या सैनिकांना सरकारी खर्चातून शिक्षण दिलं जातं. मला खात्री आहे की, सरकार उत्तीर्ण झालेल्या अग्निवीरांना आपलं कौशल्य वाढवण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी कॉलेज/अभ्यासक्रम आदींचा पर्याय उपलबध करेल तसेच इतरही सवलती जाहीर करेल. एकूणच, अग्निवीरांनाही आपलं भविष्य उज्ज्वल वाटेल.
एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे, सेवेत असलेल्या जवानांना त्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत तिशी (३०) नंतर आणि चाळिशी (४०) आधी हवी तशी नोकरी मिळवणं कठीण असतं. मात्र अग्निवीरांना अगदी विशीतच (२०) सर्व सुविधा उपलब्ध होतील, त्यांना लष्करात कठीण कामगिरी सोपवली जाईल, त्यांची निवड हजारो उमेदवारांमधून झालेली असेल. हे सर्व पाहता, ते शिस्तप्रिय कर्मचारी म्हणूनच नावारूपाला येणार यात शंका वाटत नाही. काही अग्निवीर स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी करू शकतील, काही अग्निवीरांना खासगी क्षेत्रात नोकरी मिळेल. बँका, रेल्वे आणि वाहतूक क्षेत्र, वित्तीय संस्था यामध्ये त्यांना सामावून घेतलं जाईल. काही अग्निवीर सरकारच्या सहकार्याने स्वतःचे उद्योग, व्यवसाय सुरू करू शकतील. तरुण जवान, एअरमन, आणि सेलर यांना क्वचितच अडचणी येतील. त्यांना नवीन काही शिकण्यासाठी फक्त ध्येय आणि योग्य प्रशिक्षण हवं. भारत ही नवनवीन संधींची भूमी आहे.
राष्ट्रीय-बंध
लष्करी सेवेतील व्यक्ती या गुणवत्तापूर्ण असल्यामुळे ते समाज कल्याणाच्या कामी उपयोगी पडू शकतात. अशा हजारो घटना आहेत, ज्यात लष्करातील जवानांनी गरजू व्यक्तींना अपघात अथवा आपत्तीच्या काळात मदत केली आहे. लष्करी सेवेत असताना मदतीची भावना जागृत होते, कष्टाची ओळख होते, कठीण प्रसंगी जीव अडचणींत टाकून काम फत्ते करायची सवय लागते आणि त्यातून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना कायमस्वरूपी मनात निर्माण होते. तो या देशप्रेमाची वाच्यता करत नाही. असे देशप्रेमी तरुण भारताची खरी ओळख आहेत. असे युवक समाजामध्ये राष्ट्रप्रेमाचे बंध गुंफतात. राष्ट्रीय सौहार्द आणि देशाची ओळख निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा असतो.
थोडक्यात, अग्निपथ योजनेमुळे लष्कराच्या कार्यक्षमतेवर कोणत्याही मर्यादा येणार नाहीत. युवकांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत व्हावी ही यामागची भावना आहे. ‘अग्नीपथ’ सेवेनंतर मिळालेले अधिकार वापरून चांगले भविष्य घडविता येईल. लष्कर आता नवीन बदलाच्या मार्गावर असून समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी अग्निवीर आणि सैन्य अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. अग्निपथ ही काही विनाशकारी योजना नसून व्यावसायिक कौशल्याला कोणतीही हानी न पोहोचवता ही योजना अमलात आणण्यासाठी योग्य कार्यप्रणाली बनवली आहे.