Tuesday, July 9, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराष्ट्रपती पदासाठीची भाजपची सार्थ निवड

राष्ट्रपती पदासाठीची भाजपची सार्थ निवड

देशात एकापाठोपाठ एक कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच आहेत आणि जवळ-जवळ प्रत्येक निवडणुकीत भाजपची सरशी होत आहे. अलीकडेच झालेल्या राज्यसभेसाठीच्या निवडणुकांमध्येही भाजपनेच बाजी मारली असून राज्यसभेतील पक्षाचे संख्याबळही वाढले आहे. आता संपूर्ण देशाला वेध लागले आहेत, ते पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे. विशेष म्हणजे राष्ट्रपती पदासारख्या प्रतिष्ठेच्या पदासाठी सर्वसंमतीने उमेदवार निवडला जावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते; परंतु कोणतीही गोष्ट सरळपणाने होऊ द्यायची नाही, हा आपल्या देशातील विरोधी पक्षांचा खाक्या असल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही हीच गोष्ट दिसून आली. राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, फारुख अब्दुल्ला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशा दिग्गजांच्या नावांची चर्चा झाली होती. पण त्या सर्वांनी ही निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात झलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले. त्याच वेळी भाजपने राष्ट्रपती निवडणुकीसाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केली.

गेल्या निवडणुकीत भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती. आता यावेळी आदिवासी महिलेला संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली. भाजपने राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक घेतली आणि उमेदवार निश्चत केला. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख २९ जून आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र विरोधी पक्षांनी देखील उमेदवार जाहीर केल्याने आता निवडणूक अटळ आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपच्या बैठकीत पूर्व भारतातील महिला आणि आदिवासी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील असून त्या निवडून येणार हे निश्चित आहे. तसे झाल्यास स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळण्याची शक्यता आहे, तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील. यूपीएच्या काळात काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाची संधी दिली होती. याआधीही २०१७ मध्ये देखील द्रौपदी मुर्मू यांचे नाव चर्चेत होते. मात्र भाजपने त्यावेळी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली होती. मुर्मू यांनी त्यांचे जीवन समाजाच्या सेवेसाठी आणि गरिबांना बळ देण्यासाठी समर्पित केले आहे. मागास आणि प्रगतीपासून वंचित राहिलेल्या समाज घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी कार्य केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना प्रशासनाचा अनुभव आहे. द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे व या राज्याचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओडिशा जिल्ह्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावातील रहिवासी आहेत. त्या संथाल या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सरकारी कार्यालयात त्या लेखनिक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी मोफत अध्यापनाचे काम केले व त्यानंतर त्या राजकारणात आल्या. मुर्मू यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचे म्हटल्यास, त्यांनी ओडिशात नगरसेविका म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. २०१३ मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात २००२-२००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह ६ ऑगस्ट २००२ ते मेपर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशू संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्येही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केले आहे. आता सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार ८४ वर्षीय यशवंत सिन्हा यांच्यात सामना रंगणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. अर्थात संख्याबळ पाहता मुर्मू यांचा विजय औपचारिकताच आहे. त्या राष्ट्रपती झाल्या, तर आदिवासी समुदायाला एक मोठे स्थान देशाच्या राजकारणात मिळेल आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणखी उजाळेल, यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -