हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर असलेली भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेचा घरोबा केला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असा बाळासाहेबांना शब्द दिला आहे, असे गोड वचन सांगत मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या गळ्यात घालून घेतली; परंतु अनैसर्गिक युती जास्त काळ टिकणार नाही, याचे भान मातोश्रीवरून सत्ता चालविणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आले नाही. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे आज ही बाब फक्त जनतेसमोर आली आहे.
“आम्हाला काही नको. आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाजपसोबत जनतेतून निवडून आलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारावर शिवसैनिक आणि जनता नाराज आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करू या”, अशी विनंती बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाला केली आहे. मात्र सत्तेच्या नशेत आंधळे झालेल्या मुख्यमंत्र्यांना जनतेचा कौल नक्की काय आहे, हे अजून दिसत नाही, हे दुर्दैव आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या पक्षातील आमदार अज्ञातस्थळी असताना नॉट रिचेबल होते. सेनेचे ३४ पेक्षा अधिक आमदार एकत्र कुठे आहेत? याचा राज्याच्या गृहखात्याला अनेक तास थांगपत्ता लागला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. ज्यांना स्वत:च्या पक्षातील आमदार सांभाळता येत नाही त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता; परंतु सरकार अल्पमतात येऊनसुद्धा सरकार बरखास्त करण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली नाही, याचा अर्थ अजून सत्तेचा मोह सुटत नाही, हे दिसून येते.
२०१९ साली विधानसभा निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी युती करून एकत्र लढविली होती. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. मातोश्रीवरील बंद दाराआड जी चर्चा झाली होती, त्यात सेनेला मुख्यमंत्री पद देणार असे ठरले होते, असे ठाकरे सांगू लागले. त्यातून भाजपने शब्द फिरवला, असे आरोप करत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेची समीकरणे जुळवली. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसविताना, स्वत:ची महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेतली; परंतु ही इच्छा पूर्ण करताना, विचारसरणी, पक्षांची भूमिका यांना तिलाजंली देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री पदावर पक्षप्रमुख बसलेला असताना, पुरेसा निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळत नसल्याची खंत सेना आमदारांची होती. मतदारसंघातील अनेक कामाची अडवणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पालकमंत्र्यांकडून केली जात होती. त्यामुळे सत्तेत असून फायदा काय अशी घुसमट सेना आमदारांमध्ये होती; परंतु स्वत:च्या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाण्यासह राज्यातील शिवसैनिकांमध्ये सन्नाटा पसरलेला दिसून येत आहे. त्यातून सामान्य शिवसैनिकांची आता शिंदे यांच्या बंडाला मूकसंमती असल्याचे चित्र राज्यात उभे राहिले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मुख्यमंत्र्यांनी अधिक वेळ वाया घालविला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीचे नेहमीच राजकारण केले आहे. मात्र बाळासाहेबाची कार्यशैली कधी आत्मसात केली, असे ऐकीवात नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शाखाप्रमुखापासून प्रत्येकाकडे लक्ष असायचे. त्याकाळी वर्तमानपत्रात वाचकांच्या पत्रात स्थानिक समस्या मांडली असेल, तर तेथील सेना नगरसेवक किंवा शाखाप्रमुखाला फोन करून जनतेच्या समस्या तत्काळ सोडावा, असे सांगत असत. सध्याचे पक्षप्रमुख हे बडव्यांच्या कोंडाळ्यात अडकले असल्याने जनतेच्या नक्की काय भावना आहेत? त्याचे प्रश्न काय आहेत? याची जाण त्यांना नाही, हे शिंदेसमर्थक सेना आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.
बाळासाहेब यांच्या पुण्याईवर आतापर्यंत मातोश्रीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मान दिला; परंतु पक्षप्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांची ध्येय, धोरणे आणि विचार यांना बासनात गुंडाळण्याची भूमिका घेतली असेल, तर या आमदारांना जनताही दोष देणार नाही. हे आमदार पुन्हा जनतेत येऊन निवडणुकीला सामोरे जातील, त्यावेळी त्यांचे जनतेकडून स्वागत होईल, अशी परिस्थिती आहे. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे हे सामान्य शिवसैनिकांनाही आवडलेले नव्हते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत रस्त्यावर संघर्ष करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडून आणण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांना यश आले नाही, ही बाबही सामान्य शिवसैनिकांना खटकत होती. महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे बळ असताना, विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसच्या आमदारांचा पराभव झाला. पुरेसे संख्याबळ नसताना भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले होते. भाजपच्या या विजयानंतर घंमेडीमध्ये वावरणाऱ्या महाविकास आघाडीच्या अभद्र युतीचा लवकर शक्तिपात होईल, असे वाटत होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे बाळासाहेबांनी जोपासलेल्या संघटनेची लय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घालविली आहे, अशी आता जनतेची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.