सुकृत खांडेकर
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून ते दिशा सॅलियनच्या मृत्यूपर्यंत भाजपचे लढाऊ युवा नेते आमदार नितेश राणे हे आपली भूमिका नेहमीच स्पष्ट व परखडपणे मांडताना दिसतात. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्य उद्योगमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र म्हणून त्यांच्याभोवती नेहमी प्रसिद्धीचे वलय असतेच. पण त्यांनी आमदार म्हणून काम करताना विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर एक जागरूक व कार्यक्षम नेता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दैनिक प्रहारचे संचालक म्हणून नितेश राणे यांच्याशी माझ्या भेटी होत असतात. त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडे नेहमीच नवीन व अद्ययावत माहिती असते, असे लक्षात येते. ते नेहमीच अचूक व मुद्देसूद बोलतात. अघळपघळ बोलताना मी त्यांना कधीच पाहिले नाही. वेळेचे भान असलेला हा नेता आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त काम हा त्यांचा स्वभाव आहे. प्रहारच्या मुंबई कार्यालयात येतात, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची टीम असतेच. पण त्यांना भेटायला विविध क्षेत्रांतील नामवंत येत असतात. एकदा त्यांची मीटिंग संपवून ते निघाले असताना त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले व चटकन म्हणाले, “वरळीतील बीडीडी चाळीत पोलिसांना घरे देताना त्यांना पन्नास लाख रुपये आकारले जाणार आहेत, घरांची एवढी किंमत निवृत्त पोलिसांना कशी परवडू शकेल…” त्यांचा मुद्दा माझ्या लगेच लक्षात आला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना परवडणाऱ्या किमतीत घरे का मिळू नयेत, असा अग्रलेख प्रहारमध्ये प्रसिद्ध झाला आणि ज्यांनी आयुष्य पोलीस दलाच्या सेवेत घालवले आहे, ज्यांनी गणवेषात पोलीस म्हणून मुंबईकरांची अहोरात्र सेवा केली आहे, त्यांना योग्य दरात घरे मिळावीत, अशी मोहीम प्रहारने चालवली व त्याला नंतर यशही मिळाले. नितेश राणेंनी या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष वेधले. पण मुंबईतील हजारो निवृत्त पोलीस कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहारने आवाज उठवला.
राणे कुटुंबीय भाजपमध्ये आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षात काम करताना राणे कुटुंबीयांनी जनतेच्या प्रश्नावर सतत आवाज उठविण्याचे काम केले आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री, राज्यसभेत भाजपचे खासदार. निलेश राणे हे माजी खासदार व प्रदेश भाजपचे सचिव. नितेश राणे हे भाजपचे आमदार. संपूर्ण राणे कुटुंबीय हे जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडून राज्यातील ठाकरे सरकारची झोप उडवत असते. त्यामुळे ठाकरे सरकारच्या हिट लिस्टवर नेहमीच राणे कुटुंबीय राहिले आहे. ठाकरे सरकारच्या काळात पोलीस व प्रशासनाचा ससेमिरा राणे परिवाराच्या मागे लावण्यात आला. नारायण राणेंवर महाड येथील पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांसंबंधी केलेल्या वक्तव्यावरून पोलिसांनी केलेली कारवाई, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या मारहाणीच्या घटनेत नितेश राणेंना अडकविण्याची झालेली घटना किंवा राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील निवासस्थानाच्या बांधकामावरून मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटिसा असोत. पण अशा सर्व घटनांमध्ये पोलीस व प्रशासनाचा दबाव आला म्हणून नितेश कधी डगमगले नाहीत, कधी माघार घेतली नाही. ठाकरे सरकारवरील हल्ल्याची धार विधानसभेत कधी कमी झाली नाही. नितेश यांचा बेडरपणा कधीच सौम्य झाला नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना पोलीस कारवाईत ठाकरे सरकारने अडकवून ठेवले. त्यांना प्रचाराला वेळ मिळू नये असे कारस्थान रचले. अजित पवार, सतेज पाटील, उदय सामंत असे आघाडीतील तीन पक्षांचे तीन मंत्री एका जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात उतरले होते, पण त्या सर्वांना नितेश पुरून उरले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सतीश सावंत यांनी राणे यांना आव्हान दिले, तेच सावंत पराभूत झाले. ‘नितेश राणेंना रोखा’ असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असताना सिंधुदुर्ग राणेंचाच असा संदेश या निवडणुकीच्या निकालाने दिला. त्याचे श्रेय अर्थातच नितेश व राणे परिवाराला आहे. आपल्याला चुकीचे औषध देऊन मला मारण्याचा कट केला गेला, या त्यांच्या आरोपाची चौकशी झालीच नाही. ठाकरे सरकारला त्यांच्या विरोधकांना संपवायचे आहे, असा त्यांनी थेट आरोप केला होता. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले आदित्य हे वरळी मतदारसंघातून विधानसभेवर आमदार झाले. त्याच मतदारसंघातील सचिन अहिर व सुनील शिंदे आता शिवसेनेचे आमदार म्हणून विधान परिषदेवर आहेत. एका मतदारसंघात तीन आमदार असतानाही तेथे मच्छीमार समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी नितेश राणे धावले. दुसऱ्या दिवशी मच्छीमारांचे शिष्टमंडळ त्यांना घरी भेटायला आले.
नितेश यांनी त्यांना जो दिलासा दिला त्यातून ते भारावून गेले. दिशा सॅलियन मृत्यूचे गूढ उकलावे म्हणून नितेश राणे सतत पाठपुरावा करीत आहेत. मात्र ८ जूनच्या रात्री तिथे काहीच घडलेले नाही, असे सरकार भासवत आहे. दिशाची आत्महत्या नव्हे, तर हत्याच आहे, असे नितेश वारंवार सांगत आहेत. तिच्या राहत्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज गायब का केले गेले, तेथील ड्युटीवर असलेला वाॅचमन कुठे आहे, व्हिजिटर्स बुकमधील त्या दोन दिवसांची पाने कशी गायब झाली, प्रमुख साक्षीदार कुठे आहेत या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली नाहीत. नंदकुमार चतुर्वेदी हा कुणाचा फ्रंट मॅन आहे, कुणाचा पार्टनर आहे, त्याची लिंक काय आहे, कोणा मंत्र्याचे त्याच्याशी सेटिंग आहे, त्याचा मनसुख हिरेन होणार नाही ना? या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने कधीच दिली नाहीत.
द काश्मीर फाइल्स चित्रपटाला करमाफी द्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. पण आम्ही हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही, असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करमाफी शेवटपर्यंत दिली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेची ठाकरे यांनी री ओढली.
राणे परिवारावर होत असलेल्या पोलीस व प्रशासनिक कारवाया म्हणजे अभिनेता सुशांत सिंग व दिशा सॅलियन यांच्या मृत्यूबाबतचे सत्य बाहेर येऊ नये म्हणून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी सरकारवर केला. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांच्या परिवारातील एकावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. आता उद्धव यांच्या मेव्हण्यावर असेच आरोप झाले, तर ते खुर्चीला चिकटून कसे राहतात?, त्यांना शिवसेनेत नियम व निकष वेगळे आहेत का?, असा थेट सवाल विचारण्याचे धाडस नितेश राणेच करू शकतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात नितेश राणे म्हणजे ‘अँग्री यंग मॅन’ अशी प्रतिमा तयार झाली आहे. परिणामाची पर्वा न करता ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. वाढदिवसानिमित्त त्यांना ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा…!