पुणे (हिं.स.) इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त आळंदीत येणाऱ्या वारकरी, भाविक, नागरिकांनी पाणी प्राशन करून आचमन करू नये, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.
संत ज्ञानेश्वर पालखीचे सोमवारी संध्याकाळी ०४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. कोरोना संकट काहीसे सरल्यानंतर यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने वारकरी, दिंडी, भाविक मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय योजना या अंतर्गत इंद्रायणी नदीचे दूषित झालेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच नदी पात्रात कपडे धुण्यास सुद्धा मनाई करण्यात आली असून आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून परिसरात याबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत.