अनुराधा परब
निसर्ग आणि मानवाचे नाते परस्परावलंबी आहे. निसर्गामध्ये घडणाऱ्या अनाकलनीय घटनांमागे पराशक्ती काम करत असल्याचा पूर्वापार समज आहे. हा समज तयार होण्यामागे भय भावना जशी कारण होती, तशीच मानवी आवाक्यापल्याडच्या अनामिक शक्तीविषयी, निसर्गाविषयीची आदरभावना जपली जावी, असाही सुप्त हेतू दडलेला असावा. आदरभावनेचा हेतू सोडला, तर पराशक्तीबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञाननिष्ठ विचारांमुळे पारंपरिक समजामध्ये काळानुरूप बदल होत गेल्याचे दिसून येते. रूढ परंपरांमध्ये सर्वानुमते योग्य ते बदल अनुसरून वहिवाट कायम ठेवण्यात इथली श्रद्धेय संस्कृती यशस्वी ठरलेली दिसते. माणसाची नाळ निसर्गाशी घट्ट जोडलेली असल्याने झाडे, जल, यक्ष, नाग, क्षेत्रपालादी देवता पूजनाची परंपरा इथे रुजलेली दिसते.
कोकणातील देवराया, त्यांतील देवता – यांत पुरुष तसेच स्त्री देवता – यांचे पूजन, शिवाय अदृश्य शक्तींचा वावर असण्याविषयीच्या लोककथा, त्यासंदर्भातील आचारधर्म श्रद्धासंस्कृतीकडे निर्देश करतात. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय शाखेंतर्गत येणाऱ्या कठोपनिषदामध्ये यम नचिकेत संवादाचे आख्यान येते. या आख्यानामध्ये पित्याने यमाला दानामध्ये दिलेला पुत्र नचिकेत यमाकडे जातो. तिथे गेल्यानंतर तो यमाला मृत्यूबद्दल प्रश्न विचारतो. त्यावेळेस यम म्हणतो की, माणसाचा मृत्यूविषयीचा विचार हा मुळातच मृत्यूविषयी नसून तो जीवन जगण्याविषयीचा आहे. माणसाला मृत्यूविषयीची भीती आणि जीवनात येणाऱ्या संकटांविषयीची चिंता, त्या योगाने येणारे दुःख नको असते. शक्यतो ते टाळण्याकडे किंवा त्यापासून पळण्याचे मार्ग शोधणे हा मानवी स्वभाव आहे. याचबरोबर गरज ही देखील अशी गोष्ट आहे की, ती अनेक पायंड्यांना जन्म देत असते. गरज माणसाला दुबळंही बनवते आणि ती पुरवू शकणाऱ्याला सामर्थ्यवानही बनवू शकते. यातूनच निर्माण होतात त्या आख्यायिका, लोककथा, लोकपरंपरा.
कोकणातील सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करताना त्याची नाळ गोमांतकाशी जोडलेली आढळते. कोकणातील संस्कृती द्रविड संस्कृतीच्याही जवळ जाणारी आहे. ही संस्कृती भूत-पिशाच्च, झाडे, सर्प अशा निसर्गातील शक्तींची पूजक होती. कोकणामध्येही आढळणाऱ्या देवतांमध्ये वेतोबा, रवळनाथ, सातेरी, काळभैरव, भावई, काळजाई, गांगोदेव यांसारख्या देवतांचा आढळ अधिक आहे. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या आणि घनदाट जंगलातून तुरळक वस्ती असलेल्या प्राचीन कोकणातील देवता या बहुतांशतः तिथल्या अस्पर्श, गूढ वातावरणाला साजेशा असल्याचे नावांवरून लक्षात येईल. त्याचबरोबर हा देवतागण प्रचलित देवतांपेक्षा दुय्यम स्वरूपाचा, किंबहुना क्षेत्रपाल श्रेणीमधला असला तरीही स्थानिकांच्या लेखी त्यांची जागा मायबापासारखीच होती आणि आहेही. म्हणूनच वेताळाचा वेतोबा होतो, सातेरीची सातेरी माऊली होते. काळजाई शब्दातच आई अंतर्भूत आहे. धाक आणि प्रेम असे दोन्ही एकाच देवतेठायी नांदताना पाहायचे असेल, तर कोकणातील देवतांची नावे काढून पाहावीत. प्रगत मानवाच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावर देवतांची निर्मिती झालेली असण्याची शक्यता वाटते. निसर्गातील चमत्कारांना समजून घेण्याची मानवी बुद्धीची प्रक्रिया जसजशी विकसित होत गेली, त्यानुसार देवता पूजनाविषयी, समाजाच्या स्तरीय चौकटीविषयीची नियमव्यवस्था अस्तित्वात आली असावी. या सगळ्यात आणखी एक भर पडते ती कोकणाला मिळालेल्या शापविषयक आख्यायिकांची. भृगूकुलोत्पन्न भार्गवराम अर्थात परशुरामाला ‘कोकणाचा निर्माता’ म्हटलं जातं. याच लालसर भूमीची तप्तता पाहून आदिमायेने दिलेला शाप, त्या शापाला मिळालेला उःशाप त्याची परिणती भातशेतीच्या लावणीमध्ये रूपांतरित झालेली दिसते. या कथेकडे जरा ताटस्थ्याने पाहिल्यास असे लक्षात येईल की, एकदा पीक घेतल्यानंतर शेतामध्ये जी तणादी वनस्पती उगवते ती नंतरच्या पीक उत्पादनाला हानिकारक असते. या वनस्पतींचा फटका शेतीउत्पादनाला बसू शकतो, हे शेतीविज्ञान आहे. असं असेल तर नक्कीच ‘जळो पण पिको,’ या उःशापामधून पिकाची लावणी – पेरणी करण्यापूर्वी शेताची अशाप्रकारे मशागत करून घेणे हे तर्कदृष्ट्या सुसंगत ठरते. या दृष्टीने इथल्या लोकपरंपरांचा विचार करू गेल्यास पूर्वजांनी किती विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने चालीरिती, पद्धती गुंफल्या असाव्यात, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
शाप-उःशापाची जशी ही कथा तशीच एक आणखी कथा सांगितली जाते ती, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर कोकणभूमीचा निरोप घेताना परशुरामांनी लोकांना संकटकाळी त्यांना मदतीसाठी पुकारण्याचा एक मंत्र दिला होता; परंतु मानवी मन शंकेखोर असते हेच खरे. सर्वत्र सुख-समृद्धी नांदत असतानाही लोकांनी परशुरामांनी दिलेल्या मंत्राची शहानिशा करून घेण्यासाठी त्याचे पठण सुरू केले. त्या पठणाने खरोखरच सहाय्यासाठी परशुराम धावून आले. त्यांनी मंत्रपठणाचे कारण विचारताच लोकांच्या मनीचा शंकाभाव त्यांना कळल्यानंतर त्यांनी शाप दिला.
“इथल्या लोकांना एकविचाराने, संगनमताने एकत्र येणे आणि समृद्धीचा उपभोग घेणे कधीही शक्य होणार नाही,” असा तो शाप होता. समाजरचना यथास्थित चालावी म्हणून भूमी निर्मात्याने घालून दिलेल्या पाच आकारांतही तेव्हाच्या प्रजेने आपल्या अखत्यारीत सात आकारांची भर घालून न्यायव्यवस्था चालवायला सुरुवात केली. परशुरामांना आपण घालून दिलेल्या न्यायव्यवस्थेचा तो उपमर्द वाटल्याने त्यांनी वरील शाप दिला. बारा पाचाच्या गावरहाटीविषयीची ही आख्यायिका भूमी स्थापनेनंतरच्या काळापासून चालत आलेली नियमव्यवस्था सांगते, तशीच ती इथल्या समाजाची रचनाही सुचवून जाते.
माणसाच्या आकलनापलीकडची शक्ती ही व्यक्ती आणि समष्टी म्हणजे ब्रह्मांडव्यापी शक्ती यांना जोडणारी गोष्ट असते. संपूर्ण सृष्टीवर हीच शक्ती सत्ता गाजवत असते. माणूस आपल्याप्रमाणेच देवतांचे स्वरूप पाहतो, साकारतो. त्याच्याप्रमाणेच देवताही देहधारी असल्या तरी त्यांच्या ठायीची शक्ती ही मानवी कक्षेपलीकडील असल्याने त्यातूनच दैवत कल्पना, त्याविषयीच्या आख्यायिका, कथा आकाराला येत असतात. याचेच प्रतिबिंब आपल्याला कोकणातल्या देवतांपासून ते गावऱ्हाटीपर्यंत दिसून येते.