Sunday, July 6, 2025

वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

नागपूर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज कोसळण्याच्या ३ वेगवेगळ्या घटनांमध्ये ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. योगेश रमेश पाठे (२७, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४) आणि बाबाराव मुकाजी इंगळे (६० दोघेही मुक्तापूर) अशी मृतकांची नावे आहेत.


यासंदर्भातील माहितीनुसार नरखेड तालुक्यातील हिवरमठ गावातील योगेश रमेश पाठे हा शेतकरी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात पेरणी करीत होता. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावरील दुचाकीजवळ पोहोचला. अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे १० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याला वडील नसून मोठा भाऊ व आईसोबत राहायचा. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे.


यासोबतच मुक्तापूर शिवारात पावसामुळे शेतातील झोपडीत दिनेश ज्ञानेश्वर कामडी व बाबाराव मुकाजी इंगळे हे दोघेजण बसले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज झोपडीवर कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक दिनेशचे ५ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अधिक वेळ होऊनही शेतातून का परतले नाही म्हणून दिनेशचे वडील शेतात गेले असता दोघेही शेतातील झोपडीत मृतावस्थेत आढळून आले.


तसेच पिंपळगाव (राऊत) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी दगावली. घटनेची माहिती मिळताच नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी भेट दिली. त्यानंतर तलाठी तारकेश्वर घाटोले, वसंत नासरे, राऊत यांनी तिन्ही घटनांची माहिती पोलीस व तहसीलदार जाधव यांना दिली. ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा