Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपुन्हा कोरोना विळख्याचे सावट

पुन्हा कोरोना विळख्याचे सावट

कोरोना महामारी, कोरोनाचा संसर्ग हा शब्द तुमच्या- आमच्याच नाही, तर एव्हाना जगाच्या कानाकोपऱ्यांत परिचित झालेला एक शब्द आहे. ‘कोरोना आला, त्याने पाहिले आणि त्याने होत्याचे नव्हते, सारे उद्ध्वस्त केले’, या भयावह शब्दांतच कोरोनाची व्याख्या तुम्हा-आम्हाला करावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. साधारणत: २०-२५ दिवसांपासून राज्यामध्ये विशेषत: मुंबईमध्ये कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चौथ्या लाटेचे संकेत स्पष्टपणे प्राप्त होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी मागील दोन-तीन महिन्यांत कोरोनाने मृत्यू झाल्याचे पाहावयास मिळाले नव्हते. मात्र रविवारी, १२ जून रोजी राज्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील आरोग्य विभागाचे ‘टेन्शन’ वाढीस लागले आहे. जानेवारी २०२० मध्ये भारतात कोरोनाचे आगमन झाले, त्यावेळेपासून कोरोनाने जो ‘ठिय्या’ मांडला आहे, तो आजतागायत कायम आहे. कधी तो उद्रेक करतो, तर कधी काही काळापुरता निद्रिस्त होतो. कधी आपल्या अस्तित्वाची पुन्हा जाणीव करून देत असतो.

कोरोना आल्यानंतर जगातील अनेक देशांचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे, त्याला आपला देशही अपवाद नाही. कोरोनामुळे देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार सर्वच क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शालेय जीवनाची घडीच विस्कटली असून शाळा सुरू होण्याच्या मुहूर्तावर पुन्हा कोरोना उद्रेक दाखवू लागल्याने शैक्षणिक वर्तुळावर पुन्हा एकवार काळजीचे सावट पसरले आहे. काही शाळा सुरू होऊन आज काही तासांचाच कालावधी लोटला असतानाच पुन्हा ऑनलाइनची तयारी करावी लागणार असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे. जवळपास कोरोनामुळे शाळा सव्वादोन वर्षे बंदच होत्या. मुले घरूनच अभ्यास करत होती. शिक्षक वर्गाला ऑनलाइन शिकवण्याचे काम करावे लागत होते. पालक वर्ग आर्थिक संकटात असल्याने फी भरण्यास असमर्थ ठरला होता. फीवरून शालेय व्यवस्थापन व पालकांमध्ये सुरू असलेला वाद मिटलेला नसतानाच पुन्हा ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यास पालकांकडून फी जमा करणे अवघड होणार असल्याचा सूर शिक्षक वर्गाकडून आताच आळविला जाऊ लागला आहे. सव्वादोन वर्षे मुले ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलच्या संपर्कात राहून पूर्णपणे मोबाइलच्या आहारी गेली आहेत. मुले मोबाइलवरील गेम खेळण्यात व्यस्त असल्याने मैदानी खेळ पूर्णपणे विसरले आहेत. सतत मोबाइलच्या संपर्कात असल्याने व मधल्या काळात क्रीडांगणेही बंद असल्याने मुलांची मैदानी खेळामधील रुची कमी होऊ लागली आहे. सतत मोबाइल पाहत असल्याने अधिकांश मुलांना डोळ्यांच्या तक्रारीही सुरू झाल्या आहेत. त्यातच ऑनलाइन शिक्षण मोबाइलवरच चालत असल्याने अधिकांश मुलांचे लिखाण कमी झाले असून हस्ताक्षरही बिघडले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हस्ताक्षर वर्गामध्ये पालकांनी दाखल केल्याचे पाहावयास मिळाले. शाळा सुरू झाल्याने शिक्षकांनी मुलांचे स्वागत उत्साहात केले. अर्थात या उत्साहावर पुन्हा वाढू लागलेल्या कोरोनाचे सावट स्पष्टपणे पाहावयास मिळत होते. कोरोनाची आकडेवारी वाढल्यास पुन्हा शाळा बंद होणार, ऑनलाइन शिक्षण सुरू होणार, पुन्हा फीवरून वाद होणार, हे चित्र आताच शालेय आवारात रंगवले जाऊ लागले आहे.

कोरोना महामारीमुळे उद्योग विश्वावर मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. अनेक कंपन्या, कारखान्यांचे समीकरण उद्ध्वस्त झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीचा रोजगारावरही परिणाम झाला आहे. उत्पादनच थांबल्याने अनेक कंपन्या-कारखान्यांना टाळे लावावे लागले, ते टाळे आजही उघडले गेले नाही. कामगारांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले. घरचा कर्ता पुरुषच बेरोजगार झाल्याने अनेक घरे कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली. खाण्या-पिण्याचे, उदरनिर्वाहाचे, अस्तित्व टिकविण्याचे संकट निर्माण झाले. ओळखींच्या लोकांपुढे, नातलगांपुढे हात पसरून उधार-उसनवार करावी लागली. आभाळच फाटले होते. प्रत्येकजण आपापल्या परीने कोरोना महामारीचा सामना करताना ठिगळे लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. ज्यांचे रोजगार टिकले होते, त्यांना वेतनकपातीचा सामना करावा लागला. या कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांना अनाथ बनावे लागले. ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांना त्यातून बरे होण्यासाठी उपचारासाठी कराव्या लागलेल्या कर्जाची आज परतफेड करावी लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने फारशी हानी न झाल्याने दुसऱ्या लाटेप्रति कोणी गांभीर्य बाळगले नाही आणि त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली. या दुसऱ्या लाटेतच अनेकांचे बळी पडले. कंपन्या, कारखान्यांना टाळे लागले. कर्जबाजारी व्हावे लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील घटनांची आठवण आजही असंख्य लोकांच्या अंगावर शहारे आणत आहे. मात्र आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या कार्याची करावी तितकी प्रशंसा कमीच आहे. डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय क्षेत्रातील अन्य कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य खरोखरीच उल्लेखनीय आहे. अनेकांना कित्येक दिवस घरीही जाता आले नाही.

स्वत:बरोबर घरच्यांचेही आरोग्य धोक्यात घालून धन्वंतरीच्या या पुजाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांची सेवा केली. तिसरी लाट त्या तुलनेत सौम्य राहिली. आता कुठे जनजीवन सुरळीत होत असतानाच पुन्हा चौथी लाट उंबरठ्यावर आली आहे. पुन्हा पूर्वीचे दिवस येणार की काय, या शक्यतेनेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. कोरोना झाल्यावर उपचार करण्याएेवजी कोरोना न होण्यासाठी आपण आता खबरदारी घेणे आवश्यक आहे, पथ्य पाळले पाहिजे. संकटापासून पळ काढता येणे शक्य नसल्याने संकटाचा एकत्रित सामना करावाच लागेल. मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित अंतर यांसह शासकीय नियमांचे पालन करावे लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट माणुसकी दाखवावी लागेल. जात-धर्म-प्रांत यापलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना चौथ्या लाटेत मदत करावीच लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -