सतीश पाटणकर
कोकणातील गावांच्या रूढी-परंपरांमध्ये ‘गावऱ्हाटी’ला सर्वोच्च स्थान आहे. पाषाण वा मूर्ती यांची दुरवस्था, गावकरी व मानकरी यांचे हेवे-दावे, देवस्थान इनाम जमिनींचे न्यायालयीन प्रलंबित दावे आदी विविध कारणांमुळे ‘गावऱ्हाटी’ची पिछेहाट होत गेली आहे. गावाच्या उन्नतीसाठी, सलोख्यासाठी व सुखसमाधानासाठी गावकऱ्यांनी, मानकऱ्यांनी, विश्वस्त व पुजाऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
पूर्वेस उत्तुंग पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगा आणि पश्चिमेस फेसाळलेला अथांग अरबी समुद्र या दरम्यानच्या चिंचोळ्या पट्टीला भौगोलिकदृष्ट्या कोकण म्हणतात. प्राचीन काळी याचे क्षेत्र अगदी भारताचे दक्षिण टोक असलेल्या केरळपर्यंत असावे; परंतु सध्या मात्र उत्तरेकडे तापी नदी ते दक्षिणेकडे गोमंतक प्रदेश अशा किनारी भागास कोकण असे म्हटले जाते. या निसर्गरम्य भागाला प्राचीन इतिहास आहे; परंतु आजही म्हणावे असे संशोधन कोकण भागात झालेले दिसत नाही. न्याय, नीती आणि धार्मिकतेने प्रेरित गावऱ्हाटी (गाव रहाट) यामुळे कोकणला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
आर्य आणि द्रविड संस्कृतीने प्रभावीत झालेल्या कोकण प्रांतात रूढी, परंपरा, देवता, उपासना, भक्ती, श्रद्धा यातून परमेश्वराप्रती कृतज्ञता आणि क्षमतेची भावना निर्माण झाली. कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे सर्वकाही असल्याने ती नवलाईची व सुजलाम, सुफलाम देवभूमी मानली जाते.
कोकणच्या सांस्कृतिक ठेव्यातील परंपरा कोकणवासीय आजही मोठ्या भक्तिभावाने जपत आलेत. तेथील धार्मिक रूढी, परंपरा, सहिष्णुता व माणुसकी यांमुळे त्या देवत्वाला माणुसकीचा मनोरम पदर जोडला गेलेला आहे. कोकणात ते गुण विशेष तयार झाले त्यास कारण ठरले, तिला न्याय, नीती व धर्माचे अनुष्ठान लाभलेली गावऱ्हाटी. ग्रामसंस्थेला कोकण प्रांतात विशेष महत्त्व असून ह्या ग्रामांची जी संरक्षक दैवते आहेत, त्यांना ग्रामदैवते म्हणतात. ग्रामसंस्थेत ह्या ग्रामदैवतांना प्राचीन काळापासून फार महत्त्व असल्याचे दिसून येते. वैदिक दैवते सात्त्विक व राजस आहेत, तर ही ग्रामदैवते तामस प्रकृतीची आहेत. त्यांची मंदिरे व मूर्ती वैदिक दैवतांसारखी कोरीव व आकर्षक नसून ती ओबडधोबड, तर काही केवळ प्रतीकात्मक आहेत. त्यांना पंचपक्वान्नांचे नैवेद्य चालत नाहीत, तर कोंबडा, बकरा, रेडा, लागतो. ग्रामदैवतांच्या यात्रा व उत्सव यांत कुंभार, लोहार, धोबी, धनगर, सुतार या अठरापगड जातींच्या लोकांना विशेष मान असतो. ही ग्रामदैवते त्यांच्यात व्यवसाय स्थानी किंवा घरात स्थानापन्न झालेली असतात. ही ग्रामदैवते समाजातील खालच्या स्तरातील व्यक्तींच्या घरात व व्यवसायस्थानी असण्याचे आणि त्या दैवतांच्या यात्रा व उत्सव यांत, त्या त्या जातीतील व्यक्तींना मान असण्याचे कारण पाहू गेल्यास, ही ग्रामदैवते आर्यपूर्व भारतीयांची असावीत असे मानावे लागते.
बहुतांश ग्रामदैवता स्त्रीरूपी आहेत. मातृदेवता ही सृजनाची देवता होय. भारताबाहेरही कृषिदेवता ह्या स्त्रीरूपीच मानल्या गेल्या आहेत. ही ग्रामदैवते स्थान आणि जातीजमातींपरत्वे भिन्न भिन्न नावाची आहेत व त्या प्रत्येक नावामागे काही दंतकथा आणि आख्यायिका आहेत. त्यांची स्थाने गावाबाहेर किंवा गावातील एखाद्या कोपऱ्यात कुठे तरी डामडौलाशिवाय असतात. त्यातही त्यांची मूर्ती असतेच, असे नाही आणि असली तरी ती अत्यंत ओबडधोबड असते. एखाद्या वृक्षाखाली, निसर्गरम्य ठिकाणी, जलाशयाजवळ, साध्या फांद्यांच्या मांडवाखाली किंवा एखाद्या चौथऱ्यावर ही ग्रामदैवते विराजमान झालेली असतात.
ग्रामदेवतांची कृपा असेल तर रोगराई, दुष्काळादी नैसर्गिक आपत्ती येत नाहीत तसेच धनधान्याची विपुलता होऊन सर्वांचे कल्याण होते, अशी भाबडी पण ठाम समजूत ग्रामीण जनतेत आहे. ग्रामदैवते ही तामस प्रवृत्तीची व शीघ्रकोपी आहेत, त्यांचा कोप झाला तर सर्वांनाच पिडा होते, असे समजले जाते. गावावर विघ्न, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ नये, म्हणून या ग्रामदैवतांना नवस बोलतात व तो फेडतात. दरवर्षी जत्रा-उत्सवादी करून त्यांना संतुष्ट करतात. ग्रामदैवतांपुढे पशु-पक्ष्यांचे बळी देण्यात येतात.
अनेक ग्रामदैवतांचा पुरोहित वर्ग ‘भगत’ ह्या नावाने ओळखला जातो. ‘भगत’वृत्ती वंशपरंपरेने अनेक कुटुंबात चालत आलेली असते. भज्-‘भक्त’चेच ‘भगत’ हे रूप आहे. या ग्रामदैवतांत कोकणातील रवळनाथ, सांतेरी, भुमका इतर ठिकाणी आढळणारे मुंजा, वेताळ (आग्या व रुद्र) ही ग्रामदैवते विशेष प्रसिद्ध आहेत. दुर्गम ठिकाणी तसेच मोठमोठ्या घाटांतील रस्त्यांवर त्या त्या क्षेत्राचे एखादे दैवत असते व ते त्या त्या क्षेत्रापुरते आपला प्रभाव दाखविते.
‘गावऱ्हाटी’चे सध्याचे स्वरूप आणि तिचे मूळचे स्वरूप यांत बराच फरक आहे. तिचे मूळ स्वरूप हे सात्त्विक व सोज्वळ होते. दक्षिण कोकणातील गावांच्या रूढी-परंपरांमध्ये ‘गावऱ्हाटी’ला सर्वोच्च स्थान आहे. ‘गावऱ्हाटी’ म्हणजे गावाचे दैनंदिन जीवनमान सुलभ व सुरळीत चालण्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे. सर्वांच्या भल्याचा त्यात प्रामुख्याने विचार आढळेल.
भारतीय जीवन हे धर्म व देव यांतून घडत गेल्याने विविध देवता, संप्रदाय, उपासनापद्धती, श्रद्धा यांतून सांस्कृतिक जीवनाची जडणघडण झाली. त्या परंपरा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असतात. त्या मानवी जीवनाला जगण्याचा भावनिक आधार मिळवून देतात. शिवाय, कोकण हा मूळ द्रविड संस्कृतीचा प्रभाग असलेला प्रदेश असल्याने देवदेवता, पूजाविधी, प्रतीके यांचा प्रभाव तेथे अधिक दिसून येतो.
कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी देवाचा कौल घेण्याची प्रथा आहे. त्यामधील अंधतेचा, मूढतेचा भाग वगळला तर ती पद्धत माणसाला घाईगर्दी न करण्याची, मार्गदर्शन घेण्याची पद्धत सुचवते. त्याबरोबर बारा – पाचाची देवस्की हे ‘गावऱ्हाटी’चे खास वैशिष्ट्य आहे. बारा इंद्रिये व (पाच) पंचमहाभुते म्हणजेच बारा-पाच ही संज्ञा. कौलप्रसाद म्हणजे देवाचे न्यायालय.
अलीकडे मात्र काळाच्या ओघात त्यात बरेच बदल झाले आहेत. ‘गावऱ्हाटी’ ही अतिशय व्यापक, सर्व हितकर आणि सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी प्राचीन आणि संपन्न अशी संकल्पना आहे. गावाच्या चतु:सीमेत राहणारे गावकरी, प्राणिमात्र यांचे परस्परांशी संबंधित व्यवहार म्हणजे ‘गावऱ्हाटी’ होय. त्यामध्ये मानवी समाजाचे ऐक्य व सामंजस्य अभिप्रेत आहे. ती चिपळूणपासून गोव्यातील पेडणे, साखळी, डिचोली, वाळपई, म्हापसा या तालुक्यापर्यंतच्या परिसरात आढळते. तिला विज्ञानाच्या कसोटीत बसवण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
पाषाण वा मूर्ती यांची दुरवस्था, गावकरी व मानकरी यांचे हेवे-दावे, देवस्थान इनाम जमिनींचे न्यायालयीन प्रलंबित दावे आदी विविध कारणांमुळे ‘गावऱ्हाटी’ची पिछेहाट होत गेली आहे. गावाच्या उन्नतीसाठी, सलोख्यासाठी व सुखसमाधानासाठी गावकऱ्यांनी, मानकऱ्यांनी, विश्वस्त व पुजाऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…
मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…
स्पेन : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये अंधार पसरला आहे. स्पेन, फ्रान्स आणि…
मुंबई : उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या…