राणी बागेत आता लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणी बागेत आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे.


त्यानंतर पेंग्विन, नवीन प्राणी, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. मात्र त्यानंतर आता राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणी करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पेंग्विन प्रदर्शनीजवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येईल. यामध्ये घुमटाकार स्वरूपाच्या प्रवेश मार्गाने शिरताना तेथे जणू समुद्रात उतरून मत्स्यजीवन आणि जलवैविध्य पाहत असल्याचा अनुभव येईल. तेथून पुढे बोगद्यासारख्या गोलाकार पद्धतीने दोन भागात मत्स्यालय उभारण्यात येणार आहे.


१४ मीटर लांबीच्या एका भागात प्रवाळ मत्स्य वैविध्य पाहता येईल तर ३६ मीटर अंतराच्या दुसऱ्या भागात विविध मासे आणि समुद्रातील जल परिस्थिती पाहता येणार आहे. संपूर्ण मत्स्यालयाची निर्मिती करताना त्याला नैसर्गिक रूप बहाल करण्यासाठी समुद्र जीवनाशी मिळतीजुळती बांधणी, कृत्रिम दगड, सुसंगत प्रकाश योजना आदी घटक त्यात समाविष्ट केले जाणार आहेत.


बच्चे कंपनीला ३६० अंशात गोलाकार फिरून अगदी जवळून मासे आदी पाहता येतील, अशी 'पॉप अप विंडो' उपलब्ध करून दिली जाणार आहे. मत्स्यालयात फिरताना चौकोनी आकाराचे ४, गोल आकाराचे ५ आणि अर्ध गोलाकार २ अशा एकूण ११ आधुनिक स्वरूपाच्या मत्स्य कुंडामध्ये रंगबिरंगी स्वरूपाचे मासे पाहता येतील. मत्स्यालयाची बांधणी आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे केली जाणार आहे.


मत्स्यालयातील मासे, इतर जलचर यांच्या दृष्टीने आणि एकूणच पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी खास स्वरूपाची जल जीवरक्षक प्रणाली उभारली जाणार आहे. त्याची क्षमता सुमारे १० लाख लिटर पाणी इतकी असेल. तसेच अलगीकरण कक्ष आणि त्यासाठी आवश्यक तजवीज देखील केली जाणार आहे.


मत्स्यालयातून बाहेर पडताना स्मरणिका भांडारमध्ये पर्यटकांना खरेदी करता येईल. वन्यजीवन, जलजीवन, प्राणिसंग्रहालय, पर्यावरण इत्यादींशी संबंधित पुस्तकं, वस्तू, खेळणी, वस्त्र आणि इतर साहित्य खरेदी करून नागरिकांना या मत्स्यालय आणि प्राणिसंग्रहालयाशी संबंधित आठवणी जपता येतील.


मत्स्यालयाची निर्मिती करताना इंटरप्रिटेशन इमारत, पेंग्विन कक्ष यासह परिसरातील प्रसाधनगृहे व आवश्यक त्याठिकाणी अतिरिक्त सुविधांचा देखील विस्तार आणि विकास केला जाणार आहे. मत्स्यालय बांधणीच्या निविदेमध्ये या कामांचा समावेश केला आहे. त्यामुळे सध्याच्या पेंग्विन कक्षासह इतर सुविधांना जोडून मत्स्यालयाची बांधणी करण्याचे काम एकाचवेळी आणि योग्य रीतीने समन्वय राखून होणार आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

सावित्रीबाई फुले, संत सावता स्मारकांचा मार्ग मोकळा

भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे निर्देश मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, आत्ता जीव वाचवणे महत्वाचे’

बांगलादेशात लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक फटका आता

दीपू दासच्या हत्येचे मुंबईसह, दिल्लीतही पडसाद

बांगलादेश उपउच्चायुक्तालयावर धडक; रस्त्यावर ठिय्या मुंबई : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकावरील हल्ले आणि

मका, ज्वारी खरेदी-नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ

शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत संधी मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी

Sudhir Mungantiwar : आधी घरचा आहेर, मग 'वर्षा'वर खलबतं! मुनगंटीवार-फडणवीस भेटीत नेमकं काय शिजलं?

चंद्रपूरच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचे 'बंड' की समन्वय? मुंबई : राज्यात महायुतीचा विजयाचा वारू उधळत असताना

गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध