सोलापूर (हिं.स) : आषाढी यात्रा कालावधीत यंदा १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.
त्यांनी आदेशात म्हटले आहे की, ३० जून ते १३ जुलै २०२२ या आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानांच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून लाखो भाविक/ वारकरी येतात. ९ जुलै २०२२ रोजी सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदीर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात. या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टी.व्ही. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते, छायाचित्रण केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) ३० जून ते १३ जुलै २०२२ अखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे श्रीमती पवार यांनी आदेशात म्हटले आहे.