मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगली येथील शिराळा न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र वारंट जारी केले आहे. त्यांना न्यायालयात ११ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर मनसेचे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
सांगली येथील शिराळा मधील प्रथम न्यायदंडाधिकारी पिठामध्ये यासंदर्भांत सुनावणी झाली. या सुनावणीसाठी राज ठाकरे हे वारंट निघून देखील न्यायालयात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. तर शिरीष पारकर हे न्यायालयात हजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर तसेच ७०० रुपये खर्चाची दंडाची रक्कम भरून त्यांना जमीन दिला आहे.
राज ठाकरे यांच्या विरुद्ध शिराळा न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यासाठी यापूर्वी २८ एप्रिल रोजी अजामीनपात्र वारंट दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे, तानाजी सावंत आणि शिरीष पारकर या तिघांसह एकूण १० जणांच्या विरोधात शांततेचा भंग करणे, बेकायदेशीर समूह गोळा करणे, घोषणाबाजी करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे अशा विविध कलमांखाली शिवाय २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी तसेच २८ एप्रिल २०२२ रोजी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याबद्दल शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.