मुंबई : “पक्षाच्या वतीने येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये मनसेचे मत भाजपाला मिळावे यासाठी मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले. त्यामुळे मत आम्हाला पडणार असल्याने आमचा विजय आणखी सोपा होणार आहे,” असे आशिष शेलार म्हणाले. त्यामुळे आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर तिकडे, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकजूट दाखवून विजय मिळवू आणि नंतर विजयोत्सव साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. तर आपल्याकडे पूर्ण संख्याबळ असल्याने चारही उमेदवारांची विजय निश्चित आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आमदारांच्या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीने विजय निश्चित असल्याचा संदेश दिला आहे.