Tuesday, December 10, 2024
Homeमहत्वाची बातमीएका मतासाठी आशिष शेलार 'राज दरबारात'

एका मतासाठी आशिष शेलार ‘राज दरबारात’

मुंबई : दिल्लीहून परतलेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत येताच तातडीने त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळीच ते राज ठाकरे यांच्या ‘शिवतिर्थ’ बंगल्यावर दाखल झाले. यामुळे महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच पेटलेले असताना एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत असल्याचे दिसून येते.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्य़ा मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपने संधी साधत मनसेचे एकमेव मत स्वत:कडे ओढून घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधने आल्याने भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गिरीष महाजन यांच्यावर उर्वरित राज्यातील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तत्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचे काम ते करत आहेत.

अलिकडच्या काळात मनसे आणि भाजपमध्ये हिंदूत्वावरून बैठका वाढल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका दोन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव असणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये भाजपकडून साटंलोटं होण्याची शक्यता आहे.

मनसेचे एकमेव मत भाजपच्या धनंजय महाडिक यांना द्यावे, म्हणून भाजपतर्फे प्रयत्न सुरू आहेत यासाठी आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -