मुलींनी सौंदर्यशास्त्राचे धडे घेऊन स्वत:च्या पायावर उभं रहावं यासाठी राधिका जागुष्टे प्रयत्नशील आहेत. महिला उद्योजिका घडविण्याचे महत्कार्य त्या करत आहेत.
अर्चना सोंडे
आयुष्य कधी कसं वळण घेईल हे कुणालाही सांगता येणार नाही. आलेल्या वळणावर न घाबरता दमदार पाऊल टाकतो तोच खरा माणूस होय. अशाच दमदार पावलांनी तिची वाटचाल सुरू झाली. सगळ्या अडथळ्यांना पार करत तिने स्वत:चा सौंदर्य क्षेत्रातील ब्रॅण्ड निर्माण केला, खरंतर ब्रॅण्ड म्हणजे निव्वळ बोधचिन्ह (लोगो) आणि रंगसंगती नव्हे, तर तिचं नाव घेतलंम तर महिला विश्वासाने तिच्या ब्युटी सलोनमध्ये येतात. त्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या महिलेच्या सुरक्षिततेची खात्री असते. हा विश्वास तिला सौंदर्य क्षेत्रातील ब्रॅण्ड बनवतो. एवढंच नव्हे तर ठाण्यातील दिग्गजांकडून तिला नवदुर्गा पुरस्कार मिळतो. सौंदर्यक्षेत्राला विश्वासाची जोड देणारी ही उद्योजिका म्हणजे चार्मिंग ब्यूटी सलोन आणि अॅकॅडमीच्या संचालिका राधिका जागुष्टे.
बाप म्हणजे प्रत्येक मुला-मुलीचं आभाळ असतं. हक्काचं छप्पर असतं. दुर्दैवाने राधिका ७-८ वर्षांची असताना तिचं हे आभाळ हरपलं. जाधव मूळचे पुण्याचे. राधिकाचे बाबा वसंतराव जाधव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस होते. दोन मुली आणि एक मुलगा असा छोटा संसार फुलला होता. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दैवाने या तिन्ही चिमुकल्यांना पोरकं केलं. मात्र ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ या उक्तीला जागत राधिकाच्या आईने मोठ्या धैर्याने प्रसंगाला तोंड दिलं. घरगुती शिकवणी घेत आपल्या तिन्ही चिमुरड्यांना वाढवलं. त्यांना योग्य ते संस्कार दिले. या संस्काराची आणि आईच्या धैर्याची शिदोरी घेत ही भावंडं मोठी होत होती.
या तिन्ही भावंडांमध्ये राधिका मोठी होती. त्यामुळे नकळत ती आपल्या इतर भावंडांची आई-बाबा झाली. सावलीप्रमाणे ती आपल्या भावंडांसोबत असे. घरातील कामे करत असे. दहावीपर्यंत तिचं शिक्षण कळव्याच्या गणेश विद्यालयात झाले. बारावी तिने न्यू कळवा कॉलेजमधून पूर्ण केली. पुढचं पदवीपर्यंतचं शिक्षण मात्र तिने दूरस्थ पद्धतीने केले. दूरस्थ पद्धतीने शिकत असताना ती छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत होती. दरम्यान राधिकाचं लग्न संगमेश्वरच्या एका उमद्या तरुणासोबत झाले. तिचे पती एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. कालांतराने तिने गोंडस बाळाला जन्म दिला. रुद्र असे त्याचे नामकरण केले. आज रुद्र १२ वर्षांचा आहे.
राधिकाला लहानपणापासून ब्यूटी पार्लरविषयी एक आकर्षण होतं. एका संस्थेतून तिने सौंदर्यकलेचे प्रशिक्षणदेखील घेतले. रुद्र लहान असल्याने मातृत्वाच्या ओढीने रुद्रच्या संगोपनास तिने प्राधान्य दिले. रुद्र ५-६ वर्षांचा झाल्यावर तिने आपले स्वत:चे ब्युटी पार्लर कळव्यात सुरू केले. आपलं स्वत:चं ब्युटी पार्लर असावं हे उराशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं. चार्मिंग ब्यूटी सलोन आणि अॅकॅडमी या नावाने अल्पावधीत हे पार्लर कळवा आणि भोवतलाच्या परिसरात नावारूपास आले. खरंतर राधिकाचा मनमिळावू स्वभाव आणि तिच्यासोबत असताना येणारी सुरक्षिततेची भावना यामुळे दूरच्या ठिकाणाहून महिला तिच्याकडे येत. राधिकादेखील आपल्या कौशल्याने त्या महिलांचं सौंदर्य खुलवत असे. एवढंच नव्हे, तर ती त्या महिलांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण करत असे. निव्वळ एक उद्योजिका म्हणून ती या व्यवसायाकडे पाहत नव्हती, तर आपल्याकडे येणारी प्रत्येक महिला आत्मविश्वासपूर्ण समाजात वावरली पाहिजे याकडे तिचा कटाक्ष असे.
नववधूचा मेकअप हे चार्मिंगचं खास वैशिष्ट्य आहे. “प्रत्येक स्त्री जात्याच सुंदर असते. तुम्ही तिचा आत्मविश्वास जागवलात तर तिचं सौंदर्य आपोआप खुलून येते. बोहल्यावर चढणाऱ्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक सौंदर्य फुललेलं असतं. त्याच वेळी एक प्रकारचं दडपण देखील असतं. ते दडपण आम्ही अलगद दूर करतो आणि मग आमचं सौंदर्यकौशल्य वापरून तिचं सौंदर्य उजळविण्यास मदत करतो. नववधूला नटविण्यास जो आनंद मिळतो तो शब्दांच्या पलीकडला आहे,” अशा शब्दांत राधिका आपल्या भावना व्यक्त करतात. ठाणे, कळवा, मुंबई, नवी मुंबई, बोरिवली, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून नववधूच्या मेकअपसाठी चार्मिंग ब्यूटी सलोनला मागणी असते.
यासोबतच राधिका ब्यूटी पार्लरची अकादमी देखील चालवतात. मुलींनी सौंदर्यशास्त्राचे धडे घेऊन स्वत:च्या पायावर उभं रहावं, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. महिला उद्योजिका घडविण्याचे महत्कार्य राधिका करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ठाणे भाजप अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते त्यांचा ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कोरोनाचा काळ हा खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठीच कसोटीचा काळ होता. राधिकाचे पती खासगी कंपनीत कार्यरत असल्याने त्यांना एक महिनादेखील पगार झाला नाही. त्यात लॉकडाऊनची पहिली कुऱ्हाड ब्यूटी पार्लर उद्योगावर पडली होती. मात्र राधिका यांनी हिम्मत हरली नाही. आपल्या आईच्या धैर्याच्या शिदोरीचा वापर करून घरी जाऊन सेवा दिली. कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आपल्या महिलांचं सौंदर्य अव्याहतपणे खुलवत राहिल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढवत राहिल्या.
बॉस म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंगाला पुरून उरणारी व्यक्ती. चार्मिंग ब्यूटी पार्लर, सलोन स्पा आणि अकादमीच्या राधिका जागुष्टे म्हणूनच प्रेरणादायी ‘लेडी बॉस’ ठरतात.