काल शेंदूर लावून
देव दगडात वसला
चार-दोन पैशांच्या शिदोरीने
तोही माणसात रमला…
डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे
बेताच्याच पण मनाच्या गर्दीतून शांता शेळके प्रतिष्ठानच्या ‘साहित्य गौरव’ पुरस्काराकरिता आवरत घेतच निघाले. ०६.०१ची दादर लोकल म्हणजे कामावरून सुटलेल्या चाकरमानींचा डोळ्यांत घर साठवून निघालेला प्रवास… माझा अजून पुढे पुणे ते डेक्कन ट्रेनचा प्रवास.
आली एकदाची घामजलेली ट्रेन, धक्के मारत उतरत, चढत मीही सामील झाले. आत स्वतःला कोंडीत एका जागी स्थिरावले. खरं तर नेहमीचीच वर्दळीतली माणसं. नेहमीचेच चेहरे, थोड्याफार फरकाने तेच ते प्रवासी, श्वास निश्वासाचा गाडीतला प्रवास. सारं कसं मनावर गर्दी करणारं. कुणाचा एकट्याचा प्रवास, तर कुणी फॅमिलीसोबत. जो तो मस्तवाल आपल्याच धुंदीत. मीही प्रत्येकाला टीपकागदाप्रमाणे टिपत होते. माणसातलं हरवलेलं माणूसपण शोधत होते…
पुढच्या क्षणाला लक्षात आलं, आपल्याला स्टेशनवर उतरण्याइतकाच प्रवास मिळकतीच्या पावलांचाही होता. ‘भिकारी’ या नावातली भिक्षा खूप जड करत होती. पण उघड्या डोळ्यांचा नागवेपणा रास्त होता. वार्धक्याने वाकलेला तंबोरा घेऊन एक आजोबा सावळ्याचा अभंग मधुर स्वरात गात होते. काय दिलं हो त्या सावळ्याने? ज्याचा हरिजप या वयात वणवणतोय आणि चिल्लरीच्या विश्वात सुख शोधायला लावतो. या पलीकडे काही नाही… मध्येच नाश्त्याचे विविध प्रकार घेऊन वेटरच्या रूपात वावरणारे, कमवते हात चहा-कॉफीच्या वाफेत विरघळून जातात आणि तितक्यात गोड मधुर स्वरात दोन आवाज कानी घुमतात, ‘दर्शन दे रे दे रे भगवंता…’ अहो, डोळे नसलेल्यांनी त्या भगवंताकडे दर्शन मागावं. दोन हात, दोन पायांची ही दोन माणसं मनाच्या पातळीवर मला अंध करीत होती. दोन डबे पावलं पुढे सरकत नाहीत तोच आणखी दोन आवाज मला चिरत होते. यावेळी हा आवाज चक्क दोन स्त्रियांचा होता. दोघी ठेंगण्या, नाकाची सरळ पट्टी, लांबसडक केस, जणू जुन्याच! पण फक्त बुब्बुळ फिरत असणारी नजर.. त्याही एक अंधत्व दुसऱ्या अंधत्वाशी स्पर्धा करत पुन्हा ज्याने या विश्वात आणलं, पण ते विश्व दाखवलं नाही त्याच्याच कारुण्याचे स्वर आळवत होत्या,
‘देवा, तुझे किती। सुंदर आकाश, सुंदर प्रकाश। सूर्य देतो…’
वाह…! या अंधाऱ्या अंधत्वाला सूर्याचा प्रकाश कळतो? या आणि अनेक प्रश्नांनी मनावर खरंच अंधारी येते. उघड डोळ्यांनी हे सारं बघणं अपंग करून टाकतं. काळोख ओसरत मलाही उजेडाची वाट पाहावी लागते पुन्हा आंधळं होऊन…!