विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्यातील एकमेव अशा ग्रामीण रुग्णालयावर आरोग्याची मदार आहे. मात्र ५० बेडच्या या रुग्णालयाजवळ शवविच्छेदनासाठी स्वतंत्र रूम आहे. मात्र ती बंदअवस्थेत आहे.
रुग्णालयातच तात्पुरती रूम केली असून, तेथेच शवविच्छेदन होत आहे; परंतु रुग्णालयात शवविच्छेदन करणे चुकीचे असल्याने स्वतंत्र शवविच्छेदन रूम बांधण्यात आली; परंतु गेल्या वर्षापासून शवविच्छेदन रूम तयार असतानाही याठिकाणी शवविच्छेदन होत नाही.
शवविच्छेदन रूम बांधले आहे, त्या ठिकाणी रुग्णवाहिका जाण्यासाठी रस्ता नाही. रूमपर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. तसेच पाणी, वीज यांचीही सुविधा नाही. फक्त नावापुरते बांधकाम केले आहे. शवविच्छेदनगृहाकडे जाणारा रस्ता मंजूर करून हे शवविच्छेदनगृह सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.