जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार वाहे…’’ आज या गाण्याच्या ओळीची आठवण झाली ती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे. कोव्हिड काळातील “आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या, अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन ही योजना लागू केली आहे. या योजनेमुळे देशाचे सहृदयी पंतप्रधान हे अनाथांचे नाथ बनल्याचे जाणवले. कोणावर विसंबून न राहता या मुलांना आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जगताना मोठा आधार मिळाला आहे.
देशातील नागरिकांवर अनेक आपत्ती येत असतात. सरकार यंत्रणा म्हणून या आपत्तीच्या अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत कशी मिळेल याकरिता काम करत असते. जगावर घोंघावलेल्या कोरोनाच्या संकटात भारतालाही मोठा फटका बसला होता; परंतु पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. कोरोनावरील लसनिर्मितीही भारतात निर्माण करण्यात यश आले. त्यामुळे जगातील लसीकरण राबविण्यात आलेला भारत हा प्रमुख देश ठरला होता. कोरोना काळात रुग्णालये उभारणे, व्हेंटिलेटर खरेदी करणे आणि ऑक्सिजन संयंत्र उभारणे यासाठी निधीची मोठी मदत केंद्र सरकारने केली. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले, तसेच अनेक कुटुंबांचे भवितव्यही वाचू शकले. आता कोरोनाच्या संकटापासून भारतीयांचे संरक्षण मिळविण्यात यश आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र कोरोनाकाळात जी मुले अनाथ झाली होती, त्याची पंतप्रधान मोदी यांनी आठवण ठेवली. त्यांच्या भवितव्यासाठी केंद्र सरकार म्हणून उत्तरदायित्व स्वीकारत असल्याचे दाखवून दिले आहे. पीएम केअर फॉर चिल्ड्रेन ही योजना देशभर लागू करण्यात आल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
महामारीच्या सर्वात वेदनादायक काळात इतक्या धैर्याने तोंड दिल्याबद्दल या मुलांना पंतप्रधानांनी सलाम केला. पालकांच्या प्रेमाची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. पीएम केअर फॉर चिल्ड्रेनच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मोदी म्हणाले. कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने आम्ही अडचणी कमी करण्याचा आणि देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल पंतप्रधानांनी सहानुभूतीही व्यक्त केली. “दररोज नवा संघर्ष, दररोज नवी आव्हाने असताना या मुलांचे दुःख शब्दांत मांडणे खूप कठीण आहे. मी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याच्या भावना नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना व्यक्त केल्या. देशाचा पंतप्रधान आपल्यासाठी हितगुज करत आहे, ही भावना त्या मुलांना जगण्याला नवी उमेद देणारी ठरणार आहे.
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन या योजनेमुळे दरमहा चार हजार रुपये या मुलांना मिळणार आहेत. त्याशिवाय कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल, तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत होणार आहे. वयाच्या २३व्या वर्षी १० लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्यामान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा या मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे प्रत्येक देशवासीय संवेदनशीलतेसह या मुलांच्या पाठीशी असल्याचे प्रतिबिंबित होत आहे, याचे क्षेय नरेंद्र मोदी यांना जाते.
एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी मुलांशी संवाद साधून त्यांना वडीलकीच्या नात्यातून संवाद साधला. निराशेच्या गडद वातावरणात स्वतःवर विश्वास ठेवला, तर प्रकाशाचा किरण नक्कीच दिसतो. निराशेचे रूपांतर पराभवात होऊ देऊ नका, असा सल्ला पंतप्रधानांनी मुलांना दिला. मुलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे ऐकायला हवे. या कठीण काळात चांगली पुस्तकेच त्यांचे विश्वासू मित्र बनू शकतात, त्यामुळे वाचन वाढवा, मुलांनी निरोगी राहण्याचा कटाक्ष प्रयत्न करायला हवा. खेळांमध्ये सहभागी होऊन खेलो इंडिया आणि फिट इंडिया चळवळीचे नेतृत्व करण्याची मानसिकता ठेवा. तसेच योग दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी व्हावे, असे मोदी यांनी मुलांना सांगितले.
नकारात्मकतेच्या त्या वातावरणात आपल्या देशाचा सामर्थ्यावर विश्वास होता. आपल्या शास्त्रज्ञांवर, आपल्या डॉक्टरांवर आणि आपल्या तरुणांवर विश्वास ठेवला आणि आपण जगासाठी चिंता न बनता आशेचा किरण म्हणून उदयाला आलो. आपण समस्या बनलो नाही, तर त्यावर तोडगा उपलब्ध करून देणारा बनलो. आपण जगभरातील देशांमध्ये औषधे आणि लस मात्रा पाठवल्या. आपल्या एवढ्या मोठ्या देशात, प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवली,” असेही मोदी यांना सांगून या मुलांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षांत भारताने जी जगात उंची गाठली आहे, त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. आज जगभरात भारताचा गौरव वाढला आहे, जागतिक मंचावर आपल्या भारताची ताकद वाढली आहे. भारताच्या या प्रवासाचे नेतृत्व युवाशक्ती करत आहे. तुम्ही तुमचे आयुष्य केवळ तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित करा, ती पूर्ण होणारच आहेत, असा आत्मविश्वासपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे. यातून या मुलांना नवी उमेद नक्की मिळेल, असा विश्वास वाटतो.