Thursday, April 24, 2025
Homeकोकणरायगडचौकशी सुनावणीलाच कर्जत पुरवठा विभाग उशिरा

चौकशी सुनावणीलाच कर्जत पुरवठा विभाग उशिरा

तक्रारदार कंटाळून गेले निघून; वादग्रस्त रेशन दुकानदारास पाठिशी घालण्याचा प्रयत्न

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कडाव गावातील रेशन दुकानदाराबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी होत्या. त्याबाबत स्थानिकांनी कर्जत तहसील कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने त्या तक्रारीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तक्रारदारांना डावलून रेशन दुकानदारला पाठिशी घालण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग करीत असल्याचा आरोप स्थानिक तक्रारदारांनी केला आहे.

लाभार्थींना धान्यवाटपात भ्रष्टाचार करणाऱ्या कडाव गावातील रेशनधान्य दुकानदाराची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी यासाठी सुमारे १५० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते जनार्दन दुघड यांनी कर्जत तहसीलदार यांना दिले होते. कर्जत पुरवठा विभागाच्या वतीने कडाव ग्रामपंचायत कार्यालयात रेशन दुकानदाराची चौकशी करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. सदर चौकशीच्या सुनावणी पत्रात अर्जदार यांना तक्रार अर्जावर स्वाक्षरी/ अंगठे केलेल्या तक्रारदारांपैकी दहा टक्के लाभार्थी तक्रारदारांना घेऊन उपस्थित राहण्याचे तसेच वेळेवर उपस्थित न राहिल्यास आपणास काही सांगायचे नाही असे समजून अर्ज निकाली काढण्यात येईल, असे आदेश देण्यात आले होते. यावेळी तक्रारदार जमा झाले. पण चौकशीकामी कर्जत पुरवठा विभागाचे कुणीही अधिकारी दुपार झाली तरी उपस्थित न राहिल्यामुळे लाभार्थी तक्रारदार कंटाळून निघून गेले.

शेवटी लाभार्थी तक्रारदार निघून गेल्यानंतर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी बी. टी. बुरसे व गोडाऊन तपासणीस निकाळजे हे सुनावणी सभागृहात दाखल झाले. त्यामुळे चौकशीचे कागदी घोडे नाचवणाऱ्या कर्जत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी लाभार्थी तक्रारदार याचा जबाब न घेता भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या वादग्रस्त रेशन दुकानदाराने जमवलेल्या नागरिकांचा जबाब घेतल्याने तक्रारदार लाभार्थी संतप्त झाले. शासकीय सुनावणी असूनदेखील तो रेशन दुकानधारक चौकशीसाठी आलेल्या कर्जत पुरवठा अधिकाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, वडापाव, चहापाणी देत होता. याबाबत सुनावणीचे पत्र काही मिनिटे अगोदर मिळाले होते. मग, तक्रारदार लाभार्थींनी सुनावणीस हजर राहायला नको होते व सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र द्यायला हवे होते. सुनावणीस उपस्थित राहायला थोडा वेळ झाला तरी तक्रारदारांनी थांबायला पाहिजे होते, असे मत पुरवठा निरीक्षक अधिकारी बी. टी. बुरसे यांनी व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -