दीपक परब
वादळ येणार, वणवा पेटणार’, असं म्हणत प्रदर्शित झालेली ‘रानबाजार’ ही वेब सीरिज सध्या प्लॅनेट मराठीवर सध्या धुमाकूळ घालत आहे. मराठीमधील आतापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वेब सीरिजमधील मराठमोळ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्डनेसमुळे वातावरणही चांगलेच तापले आहे. इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजचे नाव घेता येईल. वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. या सीरिजचा विषय आणि टिझर दोन्हीही प्रचंड बोल्ड आहेत. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आलाय.
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका आहेत. इतक्या बोल्डनेसमुळे या अभिनेत्री ट्रोल झाल्या आहेत. हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र रूचलेला नाही. अनेकांनी प्राजक्ताला ट्रोल केले आहे. शिवाय काहींनी तिची कौतुक देखील केले आहे. प्राजक्ताचा इतका बोल्ड अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांनी पाहिला. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली. तिची ही पहिलीच वेब सीरिज आहे.
काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने ओटीटी आणि वेब सीरिजवर भाष्य केले होते. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज किंवा चित्रपटांमध्ये प्रचंड बोल्ड कन्टेंट दाखवण्यात येतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे केले जाते, यात नवीन असे काही नाही, असे मत प्राजक्ताने मत मांडले. बोल्डनेस ही कथेची गरज असेल, तर ठीक आहे. उगाच त्यामुळे प्रेक्षक वाढतील, असे लॉजिक कुणी लावत असेल, तर ते कळणं अवघड आहे’, असे तिने म्हटले आहे. ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रे साकारण्याची, सतत काहितरी नवे करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले. पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न आहे, अशी पोस्ट टाकून तिने रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे.