Thursday, April 24, 2025
Homeसाप्ताहिककोलाजरिमझिम गिरे सावन...

रिमझिम गिरे सावन…

अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जीचा ‘मंजिल’ (१९७९) ‘आकाश कुसुम’ या १९६५च्या बंगाली सिनेमावर बेतलेला होता. समीक्षकांनी कथानकाचे कौतुक केले आणि अमिताभचा अभिनयही गौरवला. पण बासू चटर्जींचे दिग्दर्शन आणि ए. के. हंगल, ललिता पवार, श्रीराम लागू, सत्येन कप्पू, अशी नामवंत मंडळी असूनही सिनेमा फारसा चालला नाही! तरीही अतिशय तरल भावूक लेखणी असलेल्या योगेश यांची गाणी लोकांना खूप भावली. त्यातले एक गाणे लतादीदी आणि किशोरदा असे दोघांनी गायले होते. योगेश यांनी दोघांसाठी वेगवेगळा आशय दिला होता. पंचमदांनी दिलेले संगीत तर गाण्याच्या आशयाचा मूड बनवून टाकते! शांतपणे ऐकले, तर अवतीभोवती आताच रिमझिम बरसात सुरू असल्याचा भास होऊ शकतो.गाण्यातील आशयाच्या भावावस्थेत आपण जातो याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंचमदांचे अतिशय अनुरूप संगीत होते. आताही नेमका तोच ऋतू सुरू होतोय. या दिवसांत आकाशात ढगांची गर्दी होऊन त्याचे रूपांतर अंधारलेल्या राखाडी रंगाच्या ‘आभाळात’ होत असते. खुद्द सूर्यच झाकला गेल्याने सगळ्या जगाची प्रकाशयोजना एकदम बदलून जाते. पहाटे पहाटे दिसतो तसा सगळा आसमंत ढगातून मध्येच डोकावणाऱ्या प्रकाशकिरणांच्या धूसर, सौम्य निळसर छटात न्हाऊन निघतो. मग रोजच्या पाहण्यातले नेहमीचे चेहरेही किती ताजेतवाने दिसू लागतात! आणि त्यात तरुण असाल, तर मनाचे वेगळेच मुड्स तयार होत राहतात. प्रेम सफल होण्याच्या मंजिलपर्यंत पोहोचत असलेल्या, प्रेमात आकंठ बुडालेल्या अमिताभ आणि मौसमीसाठी मात्र ‘रिमझिम’ श्रावण बरसत असला तरी मन मात्र आतून सुलगत असते. –

रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन…

तारुण्याचे आगमन हे आयुष्यातील सर्वव्यापी रूपांतर असते. त्यात आपल्या प्रेमाचा उभयपक्षी स्वीकार झाल्यावर तर काय? नुसती बेधुंद अवस्था! आजूबाजूला काय आणि आपल्या ‘आत’ काय घडत आहे ते कळतच नाही! शरीरात, मनात, प्रत्येक श्वासात, घडत असलेला आमूलाग्र बदल अवघ्या अस्तित्वाला घेरून टाकत असतो. एखादे वादळ यावे आणि त्याने सगळे उद्ध्वस्त करून टाकावे, तोडून-मोडून टाकावे, तसे आपले सगळे आकलनच उलटे-पालटे होऊन जात असते. आरती मुखर्जी यांनी ‘गीत गात चल’मध्ये गायलेल्या ‘मैं वोही, दर्पन वोही, न जाने ये क्या हो गया, के सबकुछ लागे नया नया…’ या गीतासारखी भावावस्था असते ती! त्यात तो नव्हाळीचा पाऊस! यापूर्वीही पावसात कितीतरी वेळा चिंब भिजलो होतो. पण ही असली विचित्र मनोवस्था कधीच झाली नव्हती ना? –

पहले भी यूँ तो बरसे थे बादल,
पहले भी यूँ तो भीगा था आंचल
अबके बरस क्यूँ सजन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन…

पावसात भिजून अजूनच सुंदर दिसणारी मौसमी, लतादीदींच्या मधुर आवाजात म्हणते, या वर्षीचा श्रावण तर पेटूनच उठला आहे. हा वाराही काहीतरी प्यायल्यासारखा किती बेफाम सुटला आहे! हा ऋतू कसा अगदी वाहवत चाललाय नं?

इस बार सावन दहका हुआ है,
इस बार मौसम बहका हुआ है
जाने पीके चली क्या पवन,
सुलग सुलग जाए मन…

यावर अमिताभसाठी खास वेगळा आवाज लावणाऱ्या किशोरदांच्या आवाजातली दोन कडवी अजूनच मस्त आहेत. पुरुषाच्या मनातली प्रणयासक्त धुंद अवस्था योगेश यांनी उत्कटपणे चितारली आहे. पावसाचे टप टप वाजणारे थेंब त्याला घुंगरासारखे वाटतात. त्यांच्या तालबद्ध आवाजात त्याला झोप कसली यायला? मनातली प्रियेची आठवण अजूनच तीव्र होते. डोळे मिटता मिटत नाहीत. मनाच्या विशाल कॅनव्हासवर एकेक दिवास्वप्न रंगू लागते. मग प्रियकर त्यात अजून बेधुंद करणारे रंग भरू लागतो. तो अशा धुंद ऋतूत रात्ररात्र जागाच असतो –

जब घुंघरुओंसी बजती हैं बुंदे,
अरमाँ हमारे पलके न मुंदे,
कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन
भिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन…

पण या अवस्थेत मनाची कितीही तंद्री लागली, प्रियेबरोबरच्या त्या दिवास्वप्नात रममाण होत एकटेच राहावेसे वाटले तरी जग कुठे सोडते? व्यवहारात तर वावरावे लागतेच ना! जवळचे, दूरचे, सर्व संबंधित नकळत मनात सुरू असलेल्या तिच्या आराधनेत व्यत्यय आणतात. त्यांना कसे सांगायचे की, ‘अरे थांबा रे, माझ्या मनाचे बंध कुणाच्या तरी मनाशी हळुवारपणे विणले जात आहेत. तुम्ही नका ना अडथळा बनू!’ मनात ही वेदना कशी नुसती धुमसते आहे! हा ऋतू तर पावसाचा, ओलेचिंब होण्याचा आहे, मग मलाच ही कसली झळ जाणवतेय?

महफ़िल में कैसे कह दे किसीसे,
दिल बंध रहा हैं किस अजनबीसे
हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन
भिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन…

असे हे जुने सिद्धहस्त गीतकार – दिलेल्या पात्राच्या मनात, दिलेल्या प्रसंगाच्या अंतरंगात अलगद शिरून, हवा तो आशय आपल्या लेखणीतून हळुवारपणे कागदावर उतरवणारे जादूगार! त्यावर त्या शब्दांना आपल्या सुंदर स्वरांचे शरीर देऊन जिवंत करणारे संगीतकार! पुन्हा मिळतील कधी? पण मग नुसत्या आठवणीने त्या धुंद जगात क्षणभराची तरी सैर करता यावी म्हणून तर आहे ना हा आपला ‘नॉस्टॅल्जिया! ऐका गाणे जाऊन यूट्यूबवर!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -