Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजपाऊस कोसळे हा...

पाऊस कोसळे हा…

अनुराधा परब

हजारो वर्षांपासून कोकणात अशाच प्रकारे पडत असतो पाऊस, अगदी मुसळधार. दर वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरी २ हजार मि. मी. पडणाऱ्या पावसाचे ६० ते ६५ टक्के पाणी सह्याद्रीतील डोंगरउतारांमुळे नद्यांच्या द्वारे समुद्राला मिळते. या पाण्यासोबतच उतारावरील मातीचा थरही वाहून जातो. मातीचा थर नदीच्या पात्रात साचल्याने इथल्या नद्या गाळाने भरल्या आहेत. परिणामी, नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता मंदावलेली आहे. थोड्या काळात जास्त पाऊस पडल्यास पाणी त्याच्या नेमस्त काठाबाहेर येते आणि पूर येतो. गेल्या वर्षी नेमके हेच घडले आणि चिपळूण शहर पाण्याखाली गेले. महाराष्ट्र राज्यातील हवामानविषयीची वैशिष्ट्ये ही त्याला लाभलेल्या भौगोलिकतेशी निगडित आहेत. हवामानात इथे असणारे तीव्र फरक अत्यंत प्रखर आहेत.

कोकणातला सरासरी २ हजार मि.मी.च्या आसपासचा पाऊस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सहाशेच्या आसपास जातो. त्यामुळे कोकणात पाऊस जरा कमी पडला तरीही त्या प्रदेशाला आज तरी फरक पडत नाही; परंतु अन्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण थोडे जरी कमी झाले तरी पाण्यावर अवलंबून असलेल्या सर्व क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम वर्षभरात दिसून येतो. मान्सूनचे ढग सह्याद्रीने अडवल्याने कोकणात अधिक पाऊस, तर उरलेल्या ढगांतला पाऊस उर्वरित महाराष्ट्राला मिळतो. साधारण सव्वाशे वर्षांच्या उपलब्ध आकडेवारीतून असे दिसते की, आजवर महाराष्ट्रातील आतल्या भागात जवळजवळ पंचवीसपेक्षा अधिक वेळा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. कोकणात दुष्काळ पडल्याचे कधीही ऐकीवात नाही.

कोकणातील पावसावर आधारित पिके राज्यातील अन्य भागांपेक्षा वेगळी आहेत. आपल्याकडील शेती ही पूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. त्यात कोकणातील भातशेतीही आलीच. पावसाचे असमान वितरण हे भौगोलिकतेमुळे असले तरी येणाऱ्या कालावधीत हे प्रमाण अधिक विषम, तीव्र किंवा त्याचा अजून नकारात्मक प्रभाव होणे नाकारता येत नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात मुसळधार पावसाच्या दिवसांत वाढ, संततधारेच्या पावसाच्या दिवसांत घट तर मध्यम स्वरूपाच्या पावसाचे दिवस कमी आणि अतिवृष्टीचे दिवस वाढतील. हे कृषीसाठी धोकादायक आहे. याचा पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. लागून राहिलेल्या पावसाचे दिवस कमी होत जाण्याच्या शक्यतेमुळे पावसाच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या खंडांची संख्या व दिवस वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एकतर अतिवृष्टी किंवा पाऊसच नाही, असा काळ येऊ शकतो. पाऊसच नाही म्हटल्यानंतर पावसामुळे पडणाऱ्या खंडामुळे तापमानवाढ, जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार, पर्यायाने भूजल पातळीत घट होत जाणार, त्याचा परिणाम एकंदर पीकवाढीवर, उत्पादनावर, अन्नसुरक्षेवरही होऊ शकतो. पावसाच्या अतिवृष्टीबरोबरच कोकणाला वेगवेगळ्या चक्रीवादळांनीदेखील तडाखा दिलेला आहे. आधी निसर्ग आणि नंतर २०२१ साली तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीचे मोठे नुकसान केले. याची कारणे वैश्विक तापमानवाढीशीच निगडित असल्याचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर सांगतात. निसर्गाचे स्वतःचे वेळापत्रक आहे. त्याप्रमाणे तो वागत असतो. हवामानातील रोजचे बदल नैसर्गिक प्रक्रियांचे आणि चक्रांचे वाजवी घटक आहेत. त्यामुळे हवामानाचा लहरीपणा काही आजचा नाही. तो पूर्वापारपासून तसाच आहे. हवामानाच्या लहरीपणाची कारणे तात्कालिक असतात. ही कारणे संपल्यानंतर हवामान पुन्हा मूळ पदावर येत असल्याचे निरीक्षणही डॉ. केळकर नोंदवतात.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या “इंटर गर्व्हमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज” यांच्या मते वातावरणातील तापमान जसजसे वाढत जाईल, तसतसे अतिवृष्टी स्वरूपाच्या पावसाची वारंवारता वाढत जाणार आहे. मानवाचा विकासाचा अतिरेकी हव्यास हा जगाच्या तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर सांगतात, जंगलांच्या विनाशामुळे निसर्गातील कार्बनडायऑक्साईड आणि प्राणवायूचे संतुलन बिघडले आहे. कोकणातील घनदाट जंगले कमी होणे हेही याचे एक अदुर्लक्षित असे कारण आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते पूर म्हणजे धोक्याची घंटा. हे वारंवार घडू शकतं का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं अभ्यासक म्हणत असतील तर त्याकडे डोळसपणे संवेदनशीलतेसह विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायची गरज आहे, असे होसाळीकर म्हणतात. हवामानातील बदलांचा सामना करणारी यद्ययावत यंत्रणा उभी करण्याबरोबरच प्रसंगी पीकपद्धतीमध्ये बदल करावे लागतील. भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न अधिक गंभीर होतील, त्यासाठीच्या उपाययोजनांची आखणी आणि रितसर अंमलबजावणी आतापासूनच करण्याची गरज आहे. कोकणातील नदीनाल्यांना पाटबंधारे बांधल्यास, पडणारे पाणी साठवून ठेवल्यास पावसाच्या खंडाचे जे काही कालावधी असतील त्यावेळी अशा पाण्याचा वापर करणे सोयीचे होऊ शकेल. चक्रीवादळापासून बचाव होण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर बंधारे बांधल्यास समुद्राचे खारे पाणी शेतात शिरणार नाही, पर्यायाने शेताचे होणारे संभाव्य नुकसान कमी करता किंवा टाळता येऊ शकेल. या गोष्टी प्रदेशाच्या अर्थकारण, सामाजिक आरोग्य तसेच जीवनमानाशी निगडित आहेत.आयएमडीकडे असलेल्या जुन्या आकडेवारीनुसार मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे आताशा पाऊस वर्षभरात केव्हाही पडतो, या म्हणण्याला तसा काहीही अर्थ नाही. पूर्वी दळणवळण किंवा माध्यमांची इतकी उपलब्धता आजप्रमाणे नसल्याने हे कळणे अवघड होते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे आता कळायला लागले आहे इतकेच. हवामान विभाग अतिवृष्टी, पूरसदृश परिस्थितीचे तसेच चक्रीवादळांचे इशारे देत असते. याला जनसहभाग, राज्यांचा सहभाग मिळाल्यास ते तळागाळापर्यंत पोहोचणे शक्य होईल. भविष्यात चक्रीवादळांची संख्या, त्यांची तीव्रता-वेग, अतिवृष्टी, हवामानातले प्रखर विरोधाभास, परिणामी उद्भवणारी रोगराई हे सर्व तीव्र हवामान बदलामुळे होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य पद्धतीने वापर बदलत्या हवामानासंदर्भात कसा करायचा हेदेखील समजून घेतले पाहिजे. हवामानासंदर्भात जे घडणार आहे त्याचा वेग-तीव्रता कमी करता येईल का आणि त्यापासून आपला बचाव कसा करता येईल, खबरदारीचे कोणते उपाय करता येतील, याचा विचार करून सक्षम यंत्रणा उभारणीवर यापुढे भर देणे गरजेचे आहे.

anuradhaparab@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -