पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग याची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणाऱ्या ११ शाळांची बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा जोग यांच्यासह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघांवर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार समोर आला आहे.
जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर या चार जणांविरोधात याप्रकरणी भादवी ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७०, ४७१, २०१ आणि १२० ब ३४ या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
हा प्रकार जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे. या तक्रारीत बनावट प्रमाणपत्र तयार करत संस्थेवर प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी आणि ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावामध्ये खोटी स्वमान्यता प्रमाणपत्रे जोडली आहेत. तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार याप्रमाणे ११ शाळांसाठी २ लाख ७५ हजार रुपये देण्यात आल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे.
दरम्यान या गुन्ह्यात दाखल झालेल्या आरोपींना सध्या अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.