- पेशंटला डोंगर पार करून न्यावे लागते
- शिक्षणाचा बोजवारा पाचवीलाच पुजलेला
मनोज कामडी
जव्हार : जव्हार तालुक्यापासून २५ ते ३० किमी अंतरावर पिंपळशेत ग्रामपंचायतमधील २०० लोकवस्ती असलेल्या ३५ घरांचा हुंबरण हा आदिवासी पाडा विकासापासून कोसो दूर आहे. आदिवासी महिलांना पाण्यासाठी चार किमीचा डोंगर पार करून खड्ड्यातले दूषित पाणी प्यावे लागते. दिवसभर आमचा वेळ पाणी भरण्यातच जातो. कुटुंबातील सर्वांनाच दिवसभर पाणी भरावे लागते.
दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडतात. रस्ता नाही, पेशंटला चार किलोमीटरचा डोंगर पार करून डोलीतून न्यावे लागते. आमच्याकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी, येतात. समस्या जाणून घेतात, परंतु प्रश्न सोडवत नाहीत, सरकारने रस्ता व पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी विनवणी स्थानिक महिला गुलाब रावते यांनी सरकारकडे केली आहे.
हनुमान चालीसा, भोंगे हे लोकांच्या गरजेचे प्रश्न नाहीत तर राजकारण्यांचे जगण्याचे साधन आहे. गरीब आदिवासी बांधवाचे प्रश्न कोणते हे जाणून घेण्यासाठी विरोधक व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी जव्हार मोखाड्याच्या गावपाड्यात फिरावे. येथील आदिवासींना एकवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. हे प्रश्न सोडवले पाहिजेत, अशी भूमिका आदिवासी युवा संघाचे जव्हार तालुका अध्यक्ष दिनेश जाधव यांनी व्यक्त केली.
याबाबत जव्हारच्या तहसीलदार आशा तमखाडे यांच्याशी संपर्क साधला असता, हुंबरणला रस्ता नाही तर टँकर कसा जाणार, रस्त्याबाबत गटविकास अधिकारीसोबत बोला. रस्त्याचा प्रश्न त्यांच्याशी निगडित आहे, असे सरकारी उत्तर देऊन मोकळ्या झाल्या.
विकासाची पहाट उगवलीच नाही स्वातंत्र्याची ७५ वर्ष उलटूनही हुंबरणपाडा येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पावसाळा असो की उन्हाळा त्यांना बारमाही खड्ड्यातून पाणी प्यावे लागते. शाळेची इमारत आहे परंतु ती नादुरुस्त आहे. मिनी अंगणवाडी आहे. परंतु तिला इमारत नसल्याने एका घरात भरवली जाते. चांभारशेत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. परंतु प्रशासनाकडून हालचाली केल्या जात नाहीत. चांभारशेत येथे आरोग्यपथक आहे. डॉक्टर, नर्स यांचा कधीच पत्ता नसतो. रुग्णवाहिका नादुरुस्त आहे, असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी सांगितले.