संतोष कोत्रे
लांजा : पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या एसटी बसकडे पुन्हा एकदा प्रवाशांचा ओढा वाढला असून, मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची पहिली पसंती ही एसटीला असून दररोज लांजा आगारातून मुंबई, बोरिवली, परेल आणि कल्याण मार्गावर जाणाऱ्या चारही फेऱ्या प्रवाशांनी फुल्ल आहेत. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे २८ मे पर्यंतच्या सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले.
लग्नसराई, वाडीतील, गावातील पूजा यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी हे गावी दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांना आता पुन्हा एकदा मुंबईची ओढ लागली असून या सर्व मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रथम पसंती ही एसटी बसला मिळत असल्याचे एकूण चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांच्या संपानंतर एसटी फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. मात्र एसटी हीच लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसून येत आहे. संपामुळे लांजा आगाराच्या अनेक एसटी बस गाड्यांचे आरटीओ पासिंग झालेले नाही. त्यामुळे लांजा आगाराला एसटी बस गाड्यांची कमतरता जाणवत आहे.
मुंबईकर चाकरमान्यांचा प्रचंड ओढा हा एसटीकडे वळला आहे. मात्र एसटी बस उपलब्ध असल्या तरी आरटीओकडून त्यांचे पासिंग झालेले नसल्याने मागणीच्या तुलनेत लांजा आगाराकडे एसटी फेऱ्यांची कमतरता आहे. सद्यस्थितीत लांजा आगाराकडून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दररोज चार बस सोडण्यात येत असून या चारही फेऱ्यांचे २८ मे पर्यंत सर्व बुकिंग फुल्ल झाले असल्याचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले.
लांजा आगारामार्फत मुंबई चाकरमान्यांसाठी दररोज मुंबई, बोरिवली, कल्याण आणि परेल या मार्गांवर जादा फेऱ्या सोडण्यात येत आहेत. या बरोबरच प्रवाशांच्या मागणीनुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आरक्षण खिडकीवर आरक्षण उपलब्ध करून दिलेले असून प्रवाशांनी या खिडकीवर तिकीट बुक करण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले
आहे.
लांजा शहरातून सद्यस्थितीत दहा ते पंधरा खासगी लक्झरी बस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे धावत आहेत. असे असले तरी प्रवाशांची पहिली पसंती ही एसटी बसला असल्याचे दिसत आहे. आगाराकडे बस असल्या तरी अनेक बसचे आरटीओ पासिंग झाले नसल्याने गत वर्षीच्या तुलनेत मुंबईकर चाकरमान्यांना जादा फेऱ्या सोडण्यासाठी लांजा आगाराकडे बस उपलब्ध झालेल्या नाहीत.