अनुराधा परब
कोकणाचा विचार करताना समांतरपणे आपल्यासोबत साथ करत राहतो तो क्षितिजापर्यंत विस्तीर्ण निळाशार समुद्रकिनारा. खाऱ्या वाऱ्याची साथ, हिरव्या रानाची, माडांची सळसळ आणि समिंदराची गाज हे मनावर गारूड करणारं संगीत अनुभवायचं तर कोकणातच. पूर्वेला सह्याद्रीची प्रदीर्घ रांग आणि पश्चिमेकडे सागराची कुस या बेचक्यातील भूभागावर पर्जन्यराजाचे विशेष प्रेम. समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवणाऱ्या सह्यकड्यांमुळे इथे पडणाऱ्या पावसाची सरासरी ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे, हे तर सारेच जाणतो.
उत्तरेकडील रुंद असलेला कोकण प्रदेश दक्षिणेकडे अरुंद होत जातो. सह्याद्रीच्या कडेकपारीतून जन्म घेणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या कोकणातील गावखेड्यांना समृद्ध करत सागराच्या ओढीने झेपावत राहतात. सह्याद्रीच्या तीव्र उतारावरून रोंरावत खाली येताना पावसाळ्यातील त्यांचा लाल मातकट खळाळ पाहणं ही पर्वणी असते. प्रसंगी त्यांचे उग्र रूप धडकी भरवणारेही असते. गेल्या दोन वर्षांत कोकणात आलेल्या महापुराने झालेली अवस्था आजही अंगावर काटा आणते.
खरं सांगायचं तर इथला पाऊस कोकणाची फक्त ओळख नाही, तर संपूर्ण कोकणी माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य अशी व्यक्तिरेखा आहे. सागरी संपत्ती आणि पावसाच्या पाण्याभोवती इथल्या माणसांचं राहणीमान गुंफलं गेलं आहे. अविरत पडणारा पाऊस; कधी शांतपणे टिपटिपणारा पाऊस, पागोळ्यांतून रेंगाळणारा पाऊस, उन्हासोबत हलक्या सरींचा मऊसूत पाऊस अशा शब्दांतही ना सामावे अशा अनेक विभ्रमांचा पाऊस. स्वस्तिक काव्यसंग्रहातील “शब्दांतही पकडता येत नाही इतका पाऊस…” या दीर्घ कवितेमध्ये कवी वसंत सावंत पावसाळ्यातल्या निसर्गाचं वर्णन करताना ‘दिशा राखीरंग होतात’, असा फार सुंदर शब्दप्रयोग करतात. मुळातच हिरव्यागार निसर्गाला पाचूचा बहर येतो आणि विविधरंगी फुलांची सरमिसळ होते. कोकण पावसाळ्यात अधिकाधिक देखणं व्हायला लागतं. सावंतांच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘हिरव्यागर्द सृष्टीचा संगमोत्सुख नखरा’ पावसाळ्यात खुलून येतो.
यंदा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत केरळात मान्सूनच्या आगमनाची वार्ता वाचल्यापासून सच्च्या कोकणी माणसाच्या मनात कोकणातल्या पावसाचे अनुभव लाटा किनाऱ्याला थडकाव्यात तसे उसळून आठवले नाही तरच नवल. आकाशात पावसाळी ढगांचा मागमूसही नसताना अवचित वाटेत आवेगाने गाठणारा पाऊस, आंबोली घाटातला पाऊस आणि तिथला एकूणच माहोल पाऊसवेड्यांसाठी खासच. बेभान उसळलेल्या समुद्राला दुरूनच शांतपणे न्याहाळणाऱ्या नांगरून ठेवलेल्या होड्या, वाऱ्याच्या हेलकाव्यांसरशी डोलणारी नारळी-पोफळींची उंच झाडे, रात्रीच्या मिट्ट अंधारात पावसाची संततधार, वातावरणात रातकीड्यांचा – बेडकांचा घुमणारा गंभीर नाद, अवघडून दाटून राहिलेला ओलसर कुंदपणा – पावसाच्या अशा मंत्र भारलेपणाच्या अस्तित्वाचे कंगोरे समजून घ्यायचे म्हटले, तरीही इथला पाऊस संपूर्ण समजला आहे, असं घडणंच कठीण इतका तो लहरी. थेट इथल्या माणसांसारखा. कधी कसा वागेल, कसा बरसेल याचा नेम नाही.
पावसाला सुरुवात होताच सह्याद्रीतल्या कडेकपारींतून शुभ्रधवल धारांचे लयकारी नृत्य सुरू होते. त्यावरून मंगेश पाडगांवकर एका कवितेत स्वतःलाच पाऊस कल्पून असं म्हणतात की,
“मी पाऊस कोसळणारा
मी डोंगर अन् न्हाणारा
झरा चिमुकला आनंदाने
गात गात जाणारा…” गाणाऱ्या पावसाच्या पानांवरून टपटपण्याला पाडगांवकर ‘रूणझुण पैंजणां’ची उपमा देतात. पावसाच्या लहरीपणाचं वर्णन करताना ‘तर कधी अचानक येतो म्हणतो, येतच नाही चकवा देतो,’ असं चपखल शब्दरूप बांधतात. कोकणी माणूस आणि पावसाच्या स्वभावातील साधर्म्यभाव मूळचेच मालवण-वेंगुर्ल्याचे असलेले कवी मंगेश पाडगांवकर अचूक टिपतात. आरती प्रभूंच्या कवितेतून कुठे “हिरव्यात फुले पिवळा रुसवा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा…” या रूपात तर कधी “एका रिमझिम गावी, भरून आहे हृदयस्थ तान…” अशा घनगंभीर स्वरूपात तर कधी “ये रे घना, ये रे घना… न्हाऊ घाल माझ्या मना”सारख्या आर्जवांतून कोकणातला पाऊस भेटीला येतो.
“रानात झिम्म पाऊस… उन्हाला फूस तुज्या पिरतीची” असं लिहिणाऱ्या कवी महेश केळुसकर यांच्या कवितेतील “…डोळ्यांत झिंगते वाट… उसळते लाट… जुन्या दिवसांची वाटेत थांबले देव… वाहिली ठेव… जया नवसांची…” या ओळी चि. त्र्यं. खानोलकर अर्थात आरती प्रभूंच्या कोंडुरा कादंबरीतल्या गूढ अंधाराशी थेट नाळ जोडतात.
सागराच्या किनाऱ्याजवळ असलेला कोंडुरा, तिथल्या डोंगराचा तुटलेला कडा, कड्याजवळच्या विवरातलं हजारो वर्षांचं म्हातारं कासव, कोंडुराला बोलले जाणारे नवस हे सगळं वर्णन कोकणातल्या रूढी-परंपरांचं, जैवसंपदेशी असलेल्या नात्यांचं, निसर्गाप्रती असलेल्या अपार श्रद्धेचं यथार्थ चित्रण साक्षात करतं. निसर्ग, प्रीती, ईश्वरावरील श्रद्धा, मानवी जीवन अशा सगळ्यांवर भरभरून प्रेम करणाऱ्या कोकणातल्या मातीत जन्मलेल्या कविनींच नाही तर सामान्य माणसानेही या प्रदेशामुळे आपल्याला जे लाभले आहे. त्याविषयी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केलेली दिसून येते. आरती प्रभूंच्या शब्दांत लिहायचे, तर ती कृतज्ञता “आलो इथे रिकामा, बहरून जात आहे”, अशी कृतार्थ होऊन अवतरते.