श्रीनिवास बेलसरे
‘गुडाचारी ११६’ हा जेम्स बाँडच्या प्रभावातून निघालेला १९६६चा तेलुगू सिनेमा! त्याच्यावरून सुंदरलाल नहाटा यांनी १९६७ साली जितेंद्र आणि बबिताला घेऊन ‘फर्ज’ काढला. तो चांगलाच चालला. त्यामुळे रामानंद सागर यांनी लगेच १९६८ला ‘आंखे’ काढला. ‘आंखे’ हा धर्मेंद्र आणि माला सिन्हाला गुप्तहेरांच्या रूपात दर्शवणारा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे!
‘आंखे’चे चित्रीकरण परदेशातील अनेक शहरांत केले गेले. लेबनानची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये चित्रित झालेला हा पहिला हिंदी सिनेमा! मेहमूद, ललिता पवार, जीवन, धुमाळ आणि मदन पुरी यांच्या भूमिका असलेल्या ‘आंखे’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा उच्चांक केला होता. या सिनेमाने सागर यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचे ‘फिल्मफेयर’ तर श्री. जी. सिंग यांना सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफीचे फिल्मफेअर मिळवून दिले!गीतकार साहीर आणि संगीतकार रवी म्हटल्यावर गाणी हिट होणार हे गृहीतच होते. शीर्षकगीत ‘उस मुल्ककी सरहदको कोई छू नहीं सकता, जिस मुल्क के सरहदकी निगेबान हैं आंखे.’ या शेरने सुरू होणारे रफींसाहेबांच्या आवाजातले गाणे थिएटर बाहेर ऐकायला मिळाले नसले तरी त्यातील जबरदस्त आशयामुळे मनावर मोठा ठसा उमटवून गेले.लतादीदींच्या आवाजातील दोन गाणी खूपच गाजली. ‘गैरो पे करम अपनो पे सितम’ आणि ‘मिलती हैं जिंदगी में मुहब्बत कभी कभी’ यांनी विविध भारतीवर आणि रेडिओ सिलोनसह बहुतेक केंद्रावर बरीच वर्षे मुक्काम ठोकला होता. ‘त्यातही मिलती हैं मुहब्बत’ श्रोत्यांचे जास्तच लाडके झाले. कारण त्याकाळी मुहब्बत खरोखरच ‘कभी कभी’च मिळणारी चीज होती. हल्लीसारख्या चटकन रिफील करता येणाऱ्या पॅकमध्ये मुहब्बत विपूल प्रमाणात आणि सर्वत्र उपलब्ध नव्हती!
धर्मेंद्र ज्युडो शिकायला जपानमध्ये गेलेला असतो. तिथे त्याची भेट मीनाक्षीशी (माला सिन्हा) होते. ती स्व. नेताजींच्या ‘आझाद हिंद सेने’तील एका सेनाधिकाऱ्याची मुलगी असते. मीनाक्षी धर्मेंद्रच्या प्रेमात पडते. तो परोपरी समजावून सांगतो की, मी ज्या व्यवसायात आहे, तिथे जीवनापेक्षा मृत्यूची शाश्वती जास्त आहे. त्यामुळे आपले प्रेम शक्य नाही. त्याने नकार दिल्यावर ती म्हणते, ‘जितकी जगण्याची खात्री कमी तितके प्रेम लवकर करून टाकले पाहिजे. नंतर परमेश्वराने माणसाला दिलेल्या इतक्या अमूल्य देणगीपासून आपण उगाच वंचित राहिल्याचे दु:ख नको.’
मीनाक्षी धर्मेंद्रपुढे आपल्या प्रेमाचा प्रांजळ प्रस्ताव ठेवताना जे गाणे म्हणते ते म्हणजेच, ‘मिलती हैं जिंदगी में मुहब्बत कभी कभी.’ रवी यांच्या ठेकेबाज संगीतावर माला सिन्हा अवखळपणे गोड नाचली आहे. काहीशी जपानी वेशभूषा केलेली ‘मीनाक्षी’ या गाण्यात खूपच मोहक दिसते. संपूर्ण गाणे सुरू असताना, मागे बागेत इतकी सुंदर फुले फुललेली दाखवली आहेत की, खास ही फुले पाहण्यासाठी गाणे पुन्हा यूट्यूबवर पाहावे.
साहीरने ‘आंखे’च्या सर्व गाण्यांत जीवनाबद्दलचे आपले व्यापक आकलन कलात्मकपणे मांडले आहे. शीर्षकगीतात तो म्हणतो, ‘तुलता हैं बशर जिसमे वो मिजान हैं आंखे’ म्हणजे माणसाची नियत त्याच्या डोळ्यांतून दिसते. कुणाचाही खरेपणा मोजण्याचा तराजू म्हणजे त्याचे डोळे होत. दुसऱ्या गाण्यात माला सिन्हा धर्मेंद्रला त्याच्या दुसऱ्या चाहतीच्या सोबत पाहते तेव्हा क्लबमध्ये म्हटलेल्या गाण्यात साहीर
लिहितो –
‘गैरो पे करम, अपनो पे सितम, ए जाने वफा ये जुल्म न कर…’
मीनाक्षीच्या भाबड्या ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ प्रेमाची बाजू मांडताना त्याने लिहिलेल्या ओळी आणि त्यांना रवीने दिलेले संगीत, आपल्याला हळवे करून टाकतेच –
हम भी थे तेरे मंज़ूर-ए-नज़र,
जी चाहे तो अब इक़रार न कर…
सौ तीर चला सीनेपे मगर,
बेगानोसे मिलकर वार न कर…
बे-मौत कही मर जाये न हम,
ए जाने वफा ये जुल्म न कर…
रहने दे अभी थोडासा भरम…
‘मिलती हैं जिंदगी में’मध्ये साहिरने अगदी अशाच, साध्या पण मनाला स्पर्शून जाणाऱ्या, जाता जाता आतून हळवे करून टाकणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत.
‘मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी-कभी
होती है दिलबरोंकी इनायत कभी-कभी…’
हळूच आपलेसे करून टाकणाऱ्या जीवलगांची भेट आयुष्यात क्वचितच होत असते. त्यावेळी उगाच संकोचाने मागे सरकू नये. रोज रोज काही कुणाच्या मनाच्या महालाचे चोर-दरवाजे कुणासाठी उघडत नसतात! जीवनाला उलटे-पालटे करून टाकणारे वादळ माणसाच्या जीवनात काही रोज येत नसते. मात्र, कधी ते आलेच, तर त्याला आनंदाने सामोरे जावे हे साहीर कसे सांगतो, पाहा –
‘शर्मा के मुँह न फेर नज़र के सवाल पर,
लाती है ऐसे मोड़ पर क़िस्मत
कभी-कभी.
खुलते नहीं हैं रोज़ दरिचे बहार के,
आती है जान-ए-मन ये क़यामत
कभी-कभी.’
कुणालाच उभे आयुष्य काही एकट्याने काढणे शक्य नसते. कधी ना कधी, कुणा जीवलगाची उणीव भासतेच. जर असे कुणी स्वत:हून आयुष्यात आले, तर माणसाने उगाच जगण्याच्या अर्थशून्य पसाऱ्यात हरवून जाऊ नये. नियती अशी हृदयाला हृदयाच्या जवळ येऊ देण्याची संधी वारंवार देत नसते.
किती सोप्या शब्दांत साहीरने जीवनाचे त्याचे तत्त्वज्ञान गाण्यात गुंफले आहे, ते पाहणे मनोहारी आहे –
‘तनहा न कट सकेंगे जवानी के रास्ते,
पेश आएगी किसी की ज़रूरत कभी-कभी…
फिर खो न जाएं हम कहीं दुनियाकी
भीड़ में,
मिलती है पास आनेकी मुहलत
कभी-कभी…
मिलती है ज़िंदगी में मोहब्बत
कभी-कभी…
आता असे गीतकार, असे संगीतकार आणि असे गायक तरी कधी आपल्या जीवनात येणार आहेत? हा विचार आला की हुरहूर लागून राहते…